
१६२ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने रविवार २३ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय ठाणे जिल्हा साहित्य संमेलन होणार आहे. ज्येष्ठ कथालेखक संजय भास्कर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत असून मान्यवर साहित्यिक, लेखक, कवी, समीक्षक उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने साहित्याचा जागर होणार असून ग्रंथदिंडी, चर्चा, परिसंवाद, कथाकथन, मुलाखत, लेखकांची थेट भेट असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी भाषा विभाग आणि सार्वजनिक वाचनालय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन होत आहे. कल्याणमधील महावीर हॉलमध्ये हा | साहित्यिक सोहळा पार पडणार आहे. रविवारी सकाळी ७.३० वाजता
दोन भव्य ग्रंथदिंडी निघणार असून सकाळी ९.३० वाजता ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. अध्यक्ष संजय भास्कर जोशी यांचे प्रमुख भाषण होणार असून वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी स्वागताध्यक्ष आहेत.
कथेची कथा आणि गझल संध्या
‘कथेची कथा’ या कार्यक्रमात किरण चेले, सारिका कुलकर्णी, प्रज्ञा जांभेकर भाग घेणार आहेत. दुपारी चार वाजता ‘गझल संध्या’मध्ये ज्येष्ठ गझलकार आप्पा ठाकूर व ममता सिंधुताई सपकाळ हे आपल्या रचना सादर करतील. साहित्य संमेलनात ठाणे जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती वाचनालयाचे सरचिटणीस व मुख्य संयोजक भिकू बारस्कर यांनी दिली.
माझी माऊली मराठी
साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांची मुलाखत विद्या प्रभू घेणार आहेत. दुपारी १२.१५ वाजता ‘नव पिढीचे साहित्यिक’ हा परिसंवाद रंगणार असून त्यात कवी प्रथमेश पाठक, प्रकाशक संजय शिंदे, विशाखा विश्वनाथ, अक्षय शिंपी, प्रा. वृषाली विनायक भाग घेणार आहेत. ‘माझी माऊली मराठी’ हा चर्चात्मक कार्यक्रम संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. ज्येष्ठ कवी अशोक बागवे, प्रशांत मोरे, मंगेश सातपुते हे आपले विचार व्यक्त करतील. सुधीर चित्ते हे या चर्चासत्राचे सुसंवादक आहेत.




























































