
शहरातील नादुरुस्त रस्त्यांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने छेडलेल्या आंदोलनानंतर महापालिका प्रशासन ताळ्यावर आले आहे. खड्ड्यात गेलेले रस्ते, पाणीटंचाई, अस्वच्छता याविरोधात शिवसेनेने महापालिका मुख्यालयावर धडक देऊन टाळे ठोको आंदोलन केले होते.
शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली होती. वाढता भ्रष्टाचार आणि नागरी प्रश्नांकडे सातत्याने केल्या जाणाऱ्या दुर्लक्षामुळे नागरिक मेटाकुटीला आल आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होते. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उपनेते बबन पाटील आणि जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पनवेल पालिकेवर धडक दिली आणि प्रवेशद्वाराला टाळे ठोकले होते.
चाळण झालेले रस्ते सुसाट होणार
आपले पाप झाकण्यासाठी प्रशासनाने रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेतली आहेत. त्यामुळे चाळण झालेले रस्ते लवकरच सुसाट होणार आहेत. दुरुस्ती सुरू असलेल्या रस्त्यांची पाहणी महानगरप्रमुख अवचित राऊत यांनी केली. यावेळी महानगर संघटक गुरुनाथ पाटील, खारघर शहरप्रमुख गुरुनाथ म्हात्रे, शहर संघटक रामचंद्र देवरे, उपशहरप्रमुख प्रशांत जांभुळकर, विभागप्रमुख उत्तम मोर्बेकर, शाखाप्रमुख संतोष कट्टीमनी आदी उपस्थित होते.
























































