
स्वदेशी बनावटीची आणि बांधणीची ‘माहे-क्लास’ अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (ASW-SWC) प्रकारातील पहिली युद्धनौका आयएनएस ‘माहे’ (INS Mahe) हिंदुस्थानच्या नौदलात समाविष्ट (Commissioned) करण्यात आली. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवले.
सोमवारी, २४ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईत INS Mahe नौदलात समाविष्ट करण्यात आली. INS Mahe हे कोचीन शिपयार्ड लिमिटेडने डिझाइन केलेले असून, या वर्गातील आठ जहाजांपैकी हे पहिले आहे. या जहाजामध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी घटक समाविष्ट आहेत, ज्यामुळे ते ‘आत्मनिर्भर हिंदुस्थानचे’ एक महत्त्वपूर्ण प्रतीक ठरले आहे. जहाजाचे बोधचिन्ह कलरीपयट्टूची तलवार ‘उरूमी’ दर्शवते, तर ब्रीदवाक्य ‘सायलेंट हंटर्स’ जहाजाची गुप्तता आणि दक्षता दर्शवते.
या जहाजाच्या समावेशामुळे, विशेषत: किनारपट्टीच्या (littorals) उथळ पाण्यातील धोक्यांना तोंड देण्यासाठी हिंदुस्थानी नौदलाच्या पाणबुडीविरोधी क्षमतांना (ASW capabilities) मोठे बळ मिळाले आहे. हे जहाज अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर्स आणि नियंत्रण प्रणालींनी सुसज्ज आहे, ज्यामुळे ते पृष्ठभागाखालील धोके अचूकपणे शोधून निष्क्रिय करू शकते.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी या प्रसंगी बोलताना, INS माहे चा समावेश हे स्वदेशी तंत्रज्ञान वापरून जटिल लढाऊ जहाजे तयार करण्याची हिंदुस्थानची वाढती क्षमता दर्शवते, असे स्पष्ट केले. या जहाजामुळे नौदलाची जवळच्या समुद्रावर वर्चस्व गाजवण्याची क्षमता वाढेल आणि सागरी हितसंबंधांचे रक्षण होईल. त्यांनी हेही नमूद केले की भविष्यातील संघर्ष बहु-क्षेत्रीय (multi-domain) असतील, ज्यासाठी भूमी, समुद्र आणि आकाश यांच्यात समन्वयाची गरज आहे.
INS Mahe प्रकारातील जहाजे किनारी संरक्षणाची पहिली फळी तयार करतील आणि नौदलाला ‘कॉम्बॅट रेडी, कोहेसिव्ह आणि आत्मनिर्भर’ बनवतील.

























































