
खंडणी, जागा बळकविण्यासाठी दमदाटीचे गुन्हे असलेल्यांशी संबंधितांना भाजपाने त्र्यंबकेश्वर नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उमेदवारांसाठी आज प्रचारसभा घेतली. यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी नाशिक पोलिसांनी सुरू केलेल्या ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ या मोहिमेवर नाशिककर प्रश्न उपस्थित करत आहेत.
भूखंड मिळविण्यासाठी धमकी दिल्याच्या तक्रारी कैलास घुले यांच्याविरुद्ध पोलिसात आहेत, त्यांनाच भाजपाने त्र्यंबकेश्वर नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. जमिनी बळकावणे आणि खंडणीच्या अनेक गुह्यात मोक्काअंतर्गत लोंढे पिता-पुत्रांसह काहीजण जेलमध्ये आहेत. याच टोळीतील शांताराम बागुल, संकेत देवरे, कैलास चोथे यांच्याविरुद्ध जमीन बळकविल्याचा गुन्हा आहे, मात्र त्यांना अटक झालेली नाही. यातील बागुल याची पत्नी अनिता बागुल, देवरे याची आई संध्या देवरे आणि स्वतः कैलास चोथे हे भाजपाचे नगरसेवकपदाचे उमेदवार आहेत. त्यांच्यासह सर्व भाजपा उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेत या सर्वांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी ज्या लोंढे टोळीला मोक्का लावला, त्यांचे साथीदार व नातलगांचा प्रचार दस्तुरखुद्द गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनीच केला.


























































