
मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेच्या सर्व गाड्या आता एसी केल्या जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. तोसुद्धा एक रुपयाही तिकीट दरवाढ न करता, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
मुंबईत प्रचंड गर्दीमुळे त्यांना दरवाजावर लोंबकळत प्रवास करावा लागतो. आता लवकरच लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. वरळीतील एनएससीआय डोम येथे भाजपच्या वतीने आयोजित युथ कनेक्ट कार्यक्रमात मुंबईतील पायाभूत सुविधांबाबत ते बोलत होते.
मुंबईत दररोज 90 लाख लोक लोकलने प्रवास करतात. परंतु लोकलमध्ये इतकी गर्दी असते की खरा मुंबईकरच या रेल्वेने प्रवास करू शकतो. बाहेरचा माणूस या लोकल ट्रेनमध्ये प्रवेशसुद्धा करू शकत नाही. या लोकलचा विकास करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
रो-रोच्या धर्तीवर वॉटर टॅक्सी
मुंबई-अलिबाग रो-रो सेवेच्या धर्तीवर मुंबईत वॉटर टॅक्सीही सुरू केल्या जातील असे मुख्यमंत्री म्हणाले. नवी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशी वॉटर टॅक्सीने गेट वे ऑफ इंडियाला जाऊ शकतील असे त्यांनी सांगितले.
मुंबईत ‘पाताल लोक’ तयार करणार
मुंबईत ‘पाताल लोक’ तयार करण्याचा प्लान असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पाताल लोक म्हणजे मुंबईच्या भूगर्भात भुयारी मार्गांचे मोठे जाळे निर्माण केले जाणार आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे असे फडणवीस म्हणाले. भुयारी मार्गांचे हे जाळे सध्याच्या रस्त्यांना समांतर असे असेल आणि ते मेट्रोसाठीही फायदेशीर ठरेल, असे ते पुढे म्हणाले.
बोरिवली आणि गोरेगाव दरम्यानचा समांतर रस्ता आणि पुढील वर्षी अपेक्षित असलेला वरळी-शिवडी कनेक्टर, अटल सेतूपासून वांद्रे-वरळी सी लिंकपर्यंत वाहतूक सुलभ करेल. वांद्रे ते बीकेसीपर्यंत प्रस्तावित असलेला बोगदा विमानतळावर पोहोचणे सुलभ करेल, असे ते म्हणाले.























































