
डिजिटल अटकेच्या नावाखाली वृद्ध महिलेची फसवणूक करणाऱयाला पश्चिम सायबर पोलिसांनी अटक केली. अंकुश मोरे असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तक्रारदार महिला या खार येथे राहत असून त्या समाजसेविका आहेत. गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांना एकाने फोन केला. फोन करणाऱयाने तो ट्रायचा कर्मचारी असल्याचे भासवले. सिमकार्डचा गैरवापर केल्याने ते बंद होणार असल्याच्या भूलथापा मारल्या. त्यानंतर त्यांना दुसऱया नंबरवरून फोन आला. फोन करणाऱयाने तो दिल्ली पोलीस आणि सीबीआयचा अधिकारी असल्याचे भासवले. मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल झाल्याची ठगाने महिलेला भीती दाखवत याची सविस्तर चौकशी केली जाणार असल्याचे त्याना सांगितले. चौकशीच्या
नावाखाली महिलेच्या बँक खात्याची माहिती घेऊन रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगितले. अटकेच्या भीती महिलेने 1 कोटी 60 लाख रुपये तिच्या खात्यात ट्रान्स्फर केले. पैसे ट्रान्स्फर केल्यावर कोणतीही चौकशी झाली नसल्याने त्या महिलेने याची माहिती नातेवाईकांना दिली. तेव्हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. महिलेच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासा दरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अंकुश मोरे याला नाशिक येथून अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

























































