
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात धुसफूस वाढली आहे. एकमेकांचे पदाधिकारी फोडण्यावरून तणाव वाढला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने चालवली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे.
रवींद्र चव्हाण डोंबिवलीचे आमदार आहेत.ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याविषयी नाराजी आहे. या पाश्र्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी केडीएमसी निवडणुकीत शिंदे गटाशी काडीमोड घेण्याची तयारी चालवली आहे. रविवारी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तशा स्पष्ट सूचना दिल्या. केडीएमसी निवडणुकीत जो कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा असे थेटपणे त्यांनी सांगितले. 100 टक्के एका विचाराचे म्हणजेच भाजपचे सरकार आणायचे आहे असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले. एकूणच भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्यामुळे शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे.
महायुती शंभर टक्के फुटणार
कल्याण-डोंबिवलीसाठी विकास निधी देऊनही काही नगरसेवकांकडून योग्य काम झाले नाही. जाणीवपूर्वक काहींनी अडचणी आणल्या असे म्हणत त्यांनी प्रत्यक्ष शिंदे गटावर टीका केली. महापालिकेत स्वबळावर भाजपची सत्ता आली तर अनेक गोष्टी सहजपणे मार्गी लावता येतील असे चव्हाण यांनी सांगितल्याने महायुती शंभर टक्के फुटणार असा दावा कार्यक्रम ठिकाणी भाजप कार्यकर्ते करत होते.


























































