
मुंबईच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असूनही त्यावर हरकती नोंदवण्यास मुदतवाढ देण्यास निवडणूक आयोगाने एक पाऊलही पुढे टाकलेले नाही. हरकतींसाठी मुदतवाढ दिली नाही तर भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाने निवडणुका फिक्स केल्या हे स्पष्ट होईल, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला.
मुंबईच्या प्रारूप मतदार यादीतील घोळावरून आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर ट्विट करत निवडणूक आयोग आणि भाजपवर टीका केली आहे. ‘निवडणूक आयोगाची सर्कस झाली आहे. मतदार यादीतील गोंधळ आणि मतदारांच्या झालेल्या फसवणुकीचे पुरावे समोर येऊन निवडणूक आयोग कोणतीही कारवाई करत नाही. राजकीय पक्ष, मीडिया, नागरिक आणि विरोधी पक्षाच्या याचिकेनंतरही प्रारूप मतदार याद्यांवरील हरकती नोंदविण्याची मुदत 7 दिवसांवरून 21 दिवसांपर्यंत वाढविण्याच्या मागणीसंदर्भात आयोगाने अद्याप कार्यवाही केलेली नाही. तसेच हरकती मोठ्या प्रमाणात स्वीकारण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे मुक्त आणि पारदर्शक निवडणुका घेण्याची तटस्थता उरलेली नाही,’ असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळाबाबत पुराव्यासह मतचोरीचा पर्दाफाश केला आहे. आधी मतदारयाद्या सुधारा, दुबार नावांचा गोंधळ दूर करा तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणीही केली आहे तर आता हरकतींसाठी मुदतवाढीची मागणी त्यांनी केली आहे.
अन्यथा पडताळणीनंतर हरकती स्वीकारा
मतदार याद्यांमध्ये लाखो दुबार मतदार आहेत. बनावट घरांची नोंद आहे. फोटो, नाव, पत्ता किंवा एपिक क्रमांक नसलेली मतदार कार्डे मोठ्या संख्येत आहेत. त्यात दुरुस्ती करण्यासाठी आयोगाने हरकतींची मुदत वाढवली पाहिजे किंवा पडताळणीनंतर हरकती स्वीकारल्या पाहिजेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.





























































