
मुंबई मेट्रोमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
मुंबई महानगर व आसपासच्या परिसरात मेट्रोचे जाळे विस्तारले आहे. या मेट्रो मार्गामुळे प्रवाशी तसेच विद्यार्थी वर्गाला प्रवासाचे नवीन साधन उपलब्ध झाले आहे. मात्र मेट्रोचे रोजचे भाडे हे शालेय विद्यार्थ्यांकरता परवडणारे नसल्याने शालेय विद्यार्थ्यांकरिता शालेय वेळेमध्ये बेस्ट बसमधील शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या मोफत प्रवास योजनेच्या धर्तीवर मुंबई मेट्रोमध्ये मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच गैरवापर टाळण्यासाठी या सुविधेला वेळेचे तसेच प्रवासाच्या संख्येचे बंधन करण्यात यावे, अशी सूचनादेखील अनिल देसाई यांनी पत्रात केली आहे.


























































