
कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलावरून ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’ दिसत आहे. चार दिवसांमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दुसऱयांदा एकत्र नाश्ता केला. यावेळी सिद्धरामय्या हे शिवकुमार यांच्या निवासस्थानी गेले. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे सांगतानाच हायकमांड सांगेल तेव्हा शिवकुमार मुख्यमंत्री होतील, असे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनविण्याच्या मागणीसाठी त्यांचे समर्थक आमदार आग्रही आहेत. त्यामुळे गेल्या तीन आठवडय़ांपासून कर्नाटकमध्ये ही मागणी जोर धरताना दिसत आहे. त्यातच 29 नोव्हेंबरला शिवकुमार हे सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी सकाळी नाश्ता करण्यासाठी गेले. तेथे दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदही घेतली. आता मंगळवारी सकाळी सिद्धरामय्या हे शिवकुमार यांच्या निवासस्थानी पोहोचले. विधानसभा अधिवेशन आणि इतर मुद्दय़ांवर आम्ही चर्चा केली. 8 डिसेंबरला राज्यातील काँग्रेस खासदारांची बैठक बोलावण्यात आली असून त्यात शेतकरी व राज्यातील इतर प्रश्नांवर चर्चा होईल, असे सिद्धरामय्या यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री बदलावरून उठलेले वादळ शांत करण्यासाठी अखेर काँग्रेस हायकमांडने दोन्ही नेत्यांना आदेश दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतरच दोन्ही नेते आपण एकजूट असल्याचे सांगत आहेत. हायकमांडच्या हस्तक्षेपानंतर कर्नाटकच्या राजकारणातील वादळ तूर्तास शमले असले तरी हा मुद्दा कोणत्याही क्षणी तापू शकतो.
दिल्लीत बोलावले तर आम्ही दिल्लीतही जाऊ – सिद्धरामय्या
शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सिद्धरामय्या म्हणाले, हायकमांड सांगेल तेव्हा शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवू. आम्ही भाऊ आहोत. आमच्यात कोणतेही मतभेद नाही. दोघे एकत्रपणे राज्य सरकार चालवित आहोत. हायकमांडचा कोणताही निर्णय आम्हाला मान्य असेल. त्यांनी आम्हाला दिल्लीत बोलावले तर दिल्लीतही जाऊ, असे सिद्धरामय्या म्हणाले.























































