ठाण्याच्या मतदार यादीत साडेतीन हजार पंकज, सुरेश, रमेश… आडनावांचा पत्ताच नाही, शिवसेनेने केला भंडाफोड

निवडणूक आयोगाच्या ‘बोगस’ मतदार याद्यांचा आज शिवसेनेने भंडाफोड केला. ठाण्याच्या मतदार यादीत तब्बल साडेतीन हजार पंकज, सुरेश आणि रमेश अशी एकेरी अनेक नावे आहेत; मात्र त्यांच्या आडनावांची कुठलीही नोंद नाही. हे कोण लोक आहेत? असा सवाल शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केला. ठाण्याच्या एकूण 33 प्रभागांत तब्बल 67 हजार 508 दुबार मतदार आहेत, याचे पुरावेच विचारे यांनी महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना दिले. या सदोष प्रारूप याद्या तत्काळ दुरुस्त कराव्यात; अन्यथा शिवसेना स्टाईल रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली आहे. त्यावर हरकती व सूचनांसाठी 27 नोव्हेंबर शेवटची तारीख ठरवण्यात आली. त्यानंतर निवडणूक आयोगाने हरकती घेण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत वेळ दिली; मात्र मतदार याद्यांमध्ये ‘बोगसगिरी’ असल्याने त्याची छाननी करण्यात अनेक अडचणी आल्याचे राजन विचारे यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख अनिश गाढवे, ओवळा-माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा आदी उपस्थित होते.

मतदार यादीचा कारनामा

  • एकाच मतदाराचे नाव अनेक प्रभागांत, पण वय वेगळे आणि ईपीआयसी नंबर भलतेच.

  • शंभर वर्षांपेक्षा जास्त वय असलेले 562 मतदार.

  • 13 हजार 811 मतदारांच्या फोटोंचा लोचा. काहींचे फोटो अस्पष्ट तर अनेकांचे फोटोचे रकानेच रिकामे आहेत.

  • पुरुषांच्या नावासमोर स्त्रिलिंगी असा उल्लेख आणि ईपीआयसी क्रमांकही वेगळे.

  • अनेक मतदारांचे यादीत फक्त फोटो आहेत; पण त्यासमोर त्यांची नावेच छापलेली नाहीत.

  • अनेक मतदारांची नावे त्यांच्या आईपेक्षा तब्बल 52 वर्षांनी जास्त.