
हरयाणातील चौधरी रणबीर सिंह विद्यापीठात एक धक्कादायक घटना घडली. जींदमधील CRSU विद्यापीठातील शिक्षकांनी विद्यार्थिनींना अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे. या प्रकणामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेबाबत समजताच विश्वविद्यालय प्रशासनाने क़डक कारवाई करत तीन शिक्षकांना निलंबीत केले आहे.
विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सांगितले की, 27 नोव्हेंबर रोजी त्यांना पत्राद्वारे एक तक्रार मिळाली. ज्यामध्ये एका प्राध्यापकाने व्हॉट्सअॅपद्वारे विद्यार्थिनींना अश्लील संदेश पाठवल्याचा आरोप करण्यात आला होता. हे शिक्षक मुलींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत तसेच त्यांच्या कपड्यावर अश्लिल कमेंट करत असल्याचे त्यात म्हटले होते. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तोपर्यंत संपूर्ण विद्यापीठात या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये शिक्षकांविरोधात निदर्शने सुरू केली.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी निदर्शने केल्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. कुलगुरू डॉ. रामपाल सैनी यांनी सांगितले की, प्रशासन कोणतीही तक्रार आल्यावर त्यावर कठोर कारवाई करते. त्यामुळे गरज पडल्यास आम्ही पोलिसांनाही या प्रकरणाबाबत तक्रार करू, असे ते म्हणाले.
कुलगुरू डॉ. रामपाल सैनी म्हणाले, “आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देतो. लैंगिक छळ किंवा चुकीच्या वर्तनाची कोणतीही तक्रार आली तर त्यावर कारवाई केली जाईल. सीआरएसयू कॅम्पसमध्ये अशा घटकांना खपवून घेतले जाणार नाही. या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे आणि लवकरच अंतिम अहवाल सादर केला जाईल, असे कुलगुरू डॉ. रामपाल सैनी यावेळी म्हणाले.



























































