मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामकरण का करत नाही? रेल्वे मंत्रालयाला नाना शंकरशेट नामकरण संघर्ष समितीचा सवाल

गेल्या वर्षभरात देशातील अनेक रेल्वे स्थानकांची नावे केंद्र सरकारने बदलली. गेल्या आठवडय़ात राज्य सरकारच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील दोन रेल्वे स्थानकांची नावे बदलली. मग मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामांतर ‘नाना शंकरशेट मुंबई सेंट्रलटर्मिनस’ असे का करत नाही, असा सवाल नाना शंकरशेट नामकरण संघर्ष समितीने रेल्वे मंत्रालयाला केला आहे.

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या नऊ वर्षात देशातील 17 रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली. राज्य सरकारच्या केवळ पत्रव्यवहाराने रेल्वे मंत्रालयाने गेल्याच आठवडय़ात सीवूड दारावे रेल्वे स्थानकाचे ‘सीवूड दारावे करावे’ असे, तर मोहोपे रेल्वे स्थानकाचे ‘पोयंजे’ असे नामकरण केले. त्यावरून नाना शंकरशेट नामकरण संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. मुंबईचे आद्य शिल्पकार आणि शिक्षण महर्षी नाना शंकरशेट हे हिंदुस्थानी रेल्वेचे जनक आहेत. त्यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्यावे यासाठी 12 मार्च 2020 रोजी तत्काळ राज्य सरकारने विधिमंडळात एकमताने ठराव मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवला. त्याला पाच वर्षे उलटली तरी तो अद्यापही प्रलंबित का आहे? रेल्वेच्या जनकावरच रेल्वे मंत्रालय अन्याय का करत आहे, असा सवाल नाना शंकरशेट नामकरण संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. मनमोहन चोणकर यांनी केंद्र सरकारला केला आहे.

रेल्वे बोर्डाने ना हरकत देऊनही टाळाटाळ का?

लोकसभेच्या अनेक खासदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करून नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्याची मागणी केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करून या नामकरणास मंजुरी देण्याची मागणी केली आहे. तरीदेखील कार्यवाही झालेली नाही.