पुरातत्व डायरी- शिशुपालगड : नागरीकरणाची पुरातत्वीय साक्ष

>> प्रा. आशुतोष पाटील

शिशुपालगडचे महत्त्व केवळ एक पुरातत्वीय स्थळ म्हणून नाही, तर भारतीय नागरी इतिहासाच्या अभ्यासासाठी एक ‘केस स्टडी’ म्हणून मानले जाते. प्राचीन दुर्गरचना, संघटित नगरनियोजन, विकसित व्यापारजाळे, धार्मिक बहुलता आणि दीर्घकालीन वसाहती सलगता – या सर्व मुद्दय़ांचा अभ्यास शिशुपालगडच्या माध्यमातून करता येतो.

ओडिशा राज्यातील भुवनेश्वर शहराजवळ, आधुनिक जगाच्या धावपळीपासून थोडेसे दूर, जमिनीखाली एक प्राचीन भव्य नगरी शांतपणे विसावलेली आहे. या स्थळाचे नाव आहे ‘शिशुपालगड.’ प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासताना आपले लक्ष प्रामुख्याने सिंधू संस्कृतीतील हडप्पा, मोहेंजोदारो यांसारख्या नगरांकडे जाते; परंतु त्यानंतरच्या ‘दुसऱया नागरीकरणा’च्या काळात प्राचीन भारतात विकसित झालेल्या या नगराची व्याप्ती, आकारमान आणि नियोजन पाहता शिशुपालगड हे प्राचीन भारतातील सर्वात महत्त्वाच्या शहरांपैकी एक ठरते. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात या स्थळाचा स्वतंत्र अभ्यास घटक देऊन याला ‘अर्ली हिस्टॉरिक अर्बन सेंटर’ म्हणून मान्यता दिली आहे, हे त्याच्या महत्त्वाचेच द्योतक आहे.

शिशुपालगडच्या इतिहासाची शास्त्राrय मांडणी करण्याचे श्रेय प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ बी. बी. लाल यांना जाते. इ.स 1948 साली त्यांनी येथे पहिले नियोजित उत्खनन केले. त्यापूर्वी हे स्थळ स्थानिक दंतकथांमधील ‘शिशुपालाचा गड‘ किंवा प्राचीन कलिंगाची राजधानी असावे, अशा अटकळींच्याच पातळीवर होते. बी. बी. लाल यांच्या उत्खननातून नगराची तटबंदी, प्रवेशद्वारे, आंतरिक रस्त्यांची रचना आणि विपुल मृद्भांडसामग्री प्रकाशात आली. यावरून या नगराला ख्रिस्तपूर्व तिसऱया शतकापासून ते ख्रिस्तनंतरच्या चौथ्या शतकापर्यंतची भरभराट मिळाल्याचे चित्र समोर आले. 2001 नंतर डॉ. आर. के. मोहंती आणि डॉ. मोनिका स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या नव्या संशोधनातून, भूभौतिकीय सर्वेक्षण (GPR Survey) आणि नव्या उत्खननांच्या आधारे, या शहराची सुरुवात ख्रिस्तपूर्व सहावे-सातवे शतक इतकी आणखी मागे नेली गेली. त्यामुळे शिशुपालगड हे ‘दुसऱया नागरीकरणा’च्या सुरुवातीच्या टप्प्यातले एक प्रमुख केंद्र ठरते.

या नगराचे सर्वात विलक्षण वैशिष्टय़ म्हणजे त्याची परिपूर्ण चौकोनी रचना. सुमारे 1.2 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले शहर चौकोनी तटबंदीने वेढलेले आहे. प्रत्येक बाजूच्या मध्यावर दोन असे एकूण आठ महाद्वारे नियोजित पद्धतीने ठेवलेले आहेत. प्राचीन भारतात इतक्या प्रमाणात अचूकता आणि शिस्तबद्ध नगररचना फार क्वचितच आढळते. सुरुवातीला ही तटबंदी फक्त मातीची होती; नंतर नगर समृद्ध झाल्यानंतर तिला बाहेरून जांभा दगडांच्या मोठय़ा घडय़ांनी मजबूत करण्यात आले. तटबंदीची रुंदी तळाशी सुमारे 30 मीटरपर्यंत असून, आजही काही भागात तिची उंची 7-10 मीटर दिसून येते. तटबंदीच्या बाहेर ‘गंगुआ नाला’ हा नैसर्गिक जलप्रवाह असून, त्याचा वापर करून नगराभोवती खंदकासारखी संरक्षणव्यवस्था निर्माण केली गेली होती. अशा प्रकारची एकत्रित संरक्षण रचना कौटिल्याच्या अर्थशास्त्रात वर्णिलेल्या दुर्गनियोजनाची आठवण करून देते.

तटबंदीतील महाद्वारे ही शिशुपालगडचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहेत. बी. बी. लाल यांनी पश्चिमेकडील एका द्वाराचे उत्खनन केले. हे साधे प्रवेशद्वार नसून बुद्धिमान लष्करी नियोजनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मुख्य प्रवेशमार्गाच्या दोन्ही बाजूंना पुढे आलेल्या भिंती (flank walls) आणि त्यांत केलेल्या पहारेकऱयांच्या खोल्या, वर जाण्यासाठी केलेल्या पायऱया, तसेच दारांना बसवण्यासाठी दगडांत केलेली बळकट खाचा, हुक यांमुळे संकटकाळात शत्रूचा मार्ग अरुंद करून त्याला नियंत्रित करणे आणि वरून हल्ला करणे सोपे जाईल, असा उद्देश स्पष्ट दिसतो. अशा प्रकारची द्वाररचना प्राचीन भारतीय नगरनियोजनातील सामरिक सुज्ञतेचा उत्कृष्ट नमुना मानली जाते.

तटबंदी ओलांडून नगरात प्रवेश केला की समोर उभी राहते ती एक शिस्तबद्ध, नियोजनपूर्वक उभी केलेली नगरी. आधुनिक संशोधनांतून असे सिद्ध झाले आहे की शिशुपालगडमधील रस्ते ‘ग्रिड पॅटर्न’मध्ये म्हणजेच परस्परांना काटकोनात छेदणाऱया जाळीच्या स्वरूपात मांडलेले होते. प्रत्येक महाद्वारातून सरळ नगराच्या मध्यातून जाणारा प्रमुख मार्ग होता, त्याच्या दोन्ही बाजूंना निवासी घरे, कार्यशाळा आणि लहान बाजारपेठा असाव्यात, असा पुरातत्वीय अभ्यासाचा निष्कर्ष आहे. नगराच्या अगदी मध्यभागी असलेली प्रसिद्ध स्तंभयुक्त रचना म्हणजे ‘सोलाखांबा.’ येथे आजही उभे असलेले जांभ्या दगडांचे खांब दूरूनच लक्ष वेधून घेतात.

उत्खननातून मिळालेली भांडय़ांची आणि इतर वस्तुसामग्रीची संपदा शिशुपालगडच्या अर्थव्यवस्थेचा आणि सांस्कृतिक संपर्कांचा आलेख स्पष्ट करते. येथे मोठय़ा प्रमाणावर उत्तम भाजलेली लाल व राखाडी मृद्भांडसामग्री आढळते. विशेष उल्लेखनीय म्हणजे ‘रुलेटेड वेअर’ प्रकारची उच्च प्रतीची भांडी. हा प्रकार दक्षिण भारतातील समुद्री व्यापार केंद्रांमध्ये, तसेच रोमन संपर्क असलेल्या बंदरांमध्ये आढळतो. शिशुपालगडमध्ये असे भांडे सापडणे म्हणजे या नगरीचे दूरवरच्या प्रदेशांशी व्यापारी संबंध होते, याचा ठोस पुरावा होय. याशिवाय काचेच्या बांगडय़ा, मातीचे व दगडी मणी, लोखंडी अवजारे, तांब्याच्या वस्तू, वजनमोजणीशी संबंधित दगडी वजन, तसेच स्थानिक व परकीय प्रकारची नाणीही येथे सापडली आहेत. यावरून येथे विकसित कारागिरी, व्यापार आणि सुसंघटित चलनव्यवस्था अस्तित्वात होती, असे दिसते.

धार्मिक जीवनाच्या संदर्भातही शिशुपालगड अत्यंत महत्त्वाचे ठरते. नगरात आढळलेल्या बौद्ध स्वरूपाच्या रचना, स्तूपसदृश अवशेष, बुद्धप्रतिमांचे तुकडे आणि धर्मचक्रासारखी प्रतीके या सर्व गोष्टींच्या आधारे या क्षेत्रात बौद्ध धर्माचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. अशोक उत्तर काळात आणि नंतर खारवेलाच्या राजवटीत कलिंग प्रदेशात बौद्ध धर्माचा प्रसार जोरकसपणे झाला, त्या पार्श्वभूमीवर शिशुपालगड हे बौद्ध गतिविधींचे एक प्रमुख केंद्र असावे, असे संशोधक सुचवतात.

आज शिशुपालगडचे महत्त्व केवळ एक पुरातत्वीय स्थळ म्हणून नाही, तर भारतीय नागरी इतिहासाच्या अभ्यासासाठी एक ‘केस स्टडी’ म्हणून मानले जाते. प्राचीन दुर्गरचना, संघटित नगरनियोजन, विकसित व्यापारजाळे, धार्मिक बहुलता आणि दीर्घकालीन वसाहती सलगता – या सर्व मुद्दय़ांचा अभ्यास शिशुपालगडच्या माध्यमातून करता येतो. दुर्दैवाने, एवढय़ा मोठय़ा ऐतिहासिक आणि शैक्षणिक महत्त्वाचे हे स्थळ आज अनियंत्रित शहरी विस्तार, अतिक्रमण आणि जागरुकतेच्या अभावामुळे धोक्यात आले आहे. तटबंदीच्या काही भागांवर आधुनिक बांधकामे झाली आहेत; नगराच्या आतही रहिवासी वसाहती वाढताना दिसतात. या पार्श्वभूमीवर शिशुपालगडसारख्या स्थळांचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन करणे, स्पष्ट संरक्षण सीमा निश्चित करणे आणि स्थानिक लोकांमध्ये वारसा-जागरुकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. प्राचीन नागरीतेची ही जिवंत साक्ष भावी पिढय़ांपर्यंत पोहोचावी, हा सर्वांचा सामूहिक दायित्व आहे आणि त्या दायित्वाची जाणीव ठेवूनच या नगराकडे पाहणे आवश्यक आहे.

(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)

[email protected]