‘आयडीबीआय’च्या खासगीकरणाची तयारी सुरू, केंद्र सरकार विक्रीतून 64 हजार कोटी उभारणार

सरकारी मालकीच्या आयडीबीआय बँकेचे खासगीकरण होणार आहे. मुंबईस्थित असलेल्या या बँकेतील बहुसंख्य हिस्सा विकून अंदाजे 64 हजार कोटी रुपये उभारण्याची सरकारची योजना आहे. यासाठी सरकार लवकरच बोली प्रक्रिया सुरू करणार असून उदय कोटक बँकर आघाडीवर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सरकार बँक विकण्याचा प्रयत्न करत आहे. आता मात्र ही प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

आयडीबीआयच्या खासगीकरणाबाबत लवकरच औपचारिक बोली सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाव्य दावेदारांशी चर्चा सुरू असून त्यामध्ये आशिया खंडातील सर्वात श्रीमंत बँकर उदय कोटक हे आघाडीवर आहेत. जर हा व्यवहार यशस्वी झाला, तर गेल्या काही दशकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या खासगीकरणाच्या दिशेने हे पहिले मोठे पाऊल असेल.

सरकार आयडीबीआय बँक लिमिटेड आणि एलआयसीचा एकत्रित 60.72 टक्के हिस्सा विकण्याच्या विचारात आहे. बँकेच्या सध्याच्या बाजार मूल्याच्या आधारे, हा हिस्सा अंदाजे 64 हजार कोटी रुपये इतका आहे. यामध्ये बोली प्रक्रियेची सर्व तयारी जवळ जवळ पूर्ण झाली असून सरकारी एजन्सी या महिन्यात औपचारिक बोली लावू शकते.
मोठय़ा प्रमाणात कर्जबाजारी झाल्यानंतर अलीकडच्या वर्षांत व्यापक सुधारणा आणि भांडवल ओतल्यानंतर बँक पुन्हा नफ्यात आली आहे. एनपीएमध्ये लक्षणीय घट झाल्यानंतर बँक मजबूत स्थितीत आहे. अर्थ राज्यमंत्र्यांनी संसदेत माहिती दिली की, निवडलेल्या बोलीदारांची सध्या तपासणी सुरू असून मार्च 2026 मध्ये सरकार संपणाऱया आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याची आशा आहे.