
शेतकरी कर्जमाफी, तपोवनमधील वृक्षतोड, पार्थ पवार यांचे भूखंड प्रकरण, मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील सिडकोतील जमीन घोटाळय़ाचा आरोप यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर महायुती सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. त्यातच डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण, नाशिक-पुण्यातील ढासळती कायदा-सुव्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा घोळ आदी मुद्दय़ांवरील विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नसला तरी सत्ताधाऱयांना ऐन थंडीत चांगलाच घाम फुटणार आहे.
उपराजधानी नागपूरमध्ये सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जेमतेम आठवडाभर म्हणजे 14 डिसेंबरपर्यंत अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 2025-26 या वर्षातील पुरवणी मागण्या सादर होतील, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा मुंढव्यातील जमीन घोटाळा, नाशिक पुंभमेळय़ाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोड, मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील जमीन घोटाळा या मुद्दय़ांवर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सरकारची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे.
सरकारमधील वादाचे पडसाद
नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने घातलेला घोळ, भाजपकडून निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात पैशाचे वाटप झाल्याचा शिंदे गटाकडून होणार आरोप. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात उडालेल्या जाहीर वादाचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. याशिवाय बीडमधील शेकडो कोटींच्या भूसंपादन घोटाळय़ाचा मुद्दा विरोधी पक्षाकडून उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.
डॉ. संपदा मुंडे आणि डॉ. गौरी गर्जे प्रकरणामुळे भाजप बॅकफुटवर
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर आरोप होत आहेत. याशिवाय पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे सचिव अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी गर्जे-पालवे मृत्यू प्रकरणामुळे भाजप आधीच बॅकफुटवर गेली आहे. ही दोन्ही विरोधकांकडून अधिवेशनात उचलून धरले जाण्याची शक्यता आहे. तसेच नांदेडमधील आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे या युवकाची झालेली हत्या, नाशिक, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी कारवायांवरून गृहखाते सांभाळणाऱया फडणवीसांची कसोटी लागणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांची दमछाक
मंत्र्यांची गैरव्यवहार प्रकरणे आणि वादग्रस्त विधाने यामुळे महायुती सरकारच अडचणीत आले आहे. मुंढवा जमीन घोटाळा, शिरसाट प्रकरण या प्रकरणात तथ्य असल्याने सरकारने आधीच चौकशी सुरू केली आहे. अजित पवार आणि शिंदे गटाने तपोवनातील वृक्षतोडीला विरोध केला आहे. यामुळे विरोधकांचा सामना करताना मुख्यमंत्री फडणवीस फडणवीसांची दमछाक होणार आहे.
अजित पवार यांच्या राजीनाम्यासाठी दबाव
मुलगा पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील मुंढवा येथील सरकारी जमीन कवडीमोल भावात लाटण्याचा प्रयत्न केला. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच अडचणीत आले आहेत. हे प्रकरण अंगाशी येताच अजितदादा यांनी स्वतः जमीन व्यवहार रद्द करण्याची घोषणा केली. या प्रकरणात पोलिसांनी शीतल तेजवानी हिला अटक केली आहे, पण पार्थ पवार यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. यामुळे अजित पवार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून दबाव वाढविला जाणार आहे.
कामकाज विरोधी पक्षनेत्याविना
विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांना सध्या विरोधी पक्षनेता नाही. अशी अभूतपूर्व परिस्थिती अलीकडच्या काळात प्रथमच निर्माण झालेली आहे. शिवसेनेच्या वतीने विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव तर काँग्रेसने विधान परिषदेसाठी सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचे नाव निश्चित केले आहे. अधिवेशनात या नावांना विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती मान्यता देणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




























































