
हिंदुस्थानी महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना व संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत गेले काही दिवस सोशल मीडियावर बऱयाच चर्चा सुरू आहेत. 23 नोव्हेंबर रोजी होणारा दोघांचा लग्नसोहळा अचानक स्थगित करण्यात आला आणि त्यानंतर सोशल मीडियावर पलाश मुच्छलबाबत विविध माहिती समोर येऊ लागली. त्यानंतर आता स्मृतीने स्वतः पुढे येत दोघांचे लग्न रद्द झाल्याची माहिती दिली आहे.
स्मृतीच्या लग्नादिवशी तिच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे लग्न थांबविण्यात येत असल्याचे स्मृतीच्या टीमकडून सांगण्यात आले. त्यानंतर पलाश मुच्छलचीदेखील प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले व दुसऱया दिवशी तो मुंबईला परतला. यादरम्यान स्मृती व पलाश यांचा लग्न सोहळा स्थगित झाल्यानंतर स्मृतीने तिच्या इन्स्टाग्रामवरून लग्नासंबंधित फोटो, व्हिडीओ डिलीट केले होते. स्मृती मानधना या संपूर्ण प्रकरणानंतर सोशल मीडियापासून दूर होती. त्यानंतर आता रविवारी तिने पोस्ट शेअर करत लग्न रद्द झाल्याची माहिती शेअर केली.
काय म्हणाली स्मृती…
स्मृती म्हणाली की, गेल्या काही आठवडय़ांपासून माझ्या आयुष्याबद्दल खूप चर्चा सुरू आहेत. मला वाटते की, सध्या मी बोलणे महत्त्वाचे आहे. मी खूप प्रायव्हेट पर्सन आहे आणि मला माझे आयुष्य असेच ठेवायचे आहे, पण मी हे स्पष्ट करू इच्छिते की, लग्न रद्द झाले आहे. पुढे तिने लिहिले, ‘मी हे प्रकरण इथेच थांबवू इच्छिते. मी तुम्हा सर्वांना असेच करण्याची विनंती करते. मी तुम्हाला या वेळी दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करते. आम्हाला पुढे जाण्याची संधी द्या. मला विश्वास आहे की, आपल्या सर्वांचा एक मोठा उद्देश आहे आणि माझ्यासाठी तो नेहमीच सर्वोच्च स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे आहे. मला आशा आहे की, मी जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत देशासाठी खेळत राहीन आणि ट्रॉफी जिंकत राहीन आणि ते नेहमीच माझे लक्ष्य असेल.’


























































