
व्हिसा नियमांचे उल्लंघन करून आणि कोणतीही परवानगी न घेता लडाख व कश्मीरमधील अत्यंत संवेदनशील भागात आलेल्या एका चिनी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. तपास यंत्रणांनी श्रीनगरमधून त्याला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या व्यक्तीने संवेदनशील माहिती लीक केली आहे का, हे तपासले जात आहे.
पर्यटन व्हिसावर 19 नोव्हेंबर रोजी दिल्लीत आलेला हू कॉंगताई (Hu Congtai) याने परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयात (FRRO) नोंदणी न करता कथितरित्या लेह, झांस्कर आणि कश्मीर खोऱ्यातील विविध प्रतिबंधित क्षेत्रांना भेट दिली.
29 वर्षीय हू काँगताई याने झांस्करमध्ये तीन दिवस मुक्काम केला. त्याचा व्हिसा केवळ वाराणसी, आग्रा, नवी दिल्ली, जयपूर, सारनाथ, गया आणि कुशीनगर यांसारख्या निवडक बौद्ध धार्मिक स्थळांना भेट देण्याची परवानगी देत असतानाही त्याने अनेक मठ आणि संरक्षणच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी दिल्या.
हूच्या प्रवासाच्या यादीत अनेक संवेदनशील ठिकाणे समाविष्ट आहेत, ज्यात हारवान (Hawrwan) येथील बौद्ध मठ आणि दक्षिण काश्मीरमधील अवंतीपोरा (Awantipora) येथील बौद्ध अवशेष यांचा समावेश आहे. अवंतीपोरा हे ठिकाण लष्कराच्या व्हिक्टर फोर्स मुख्यालयाच्या अगदी जवळ आहे. याशिवाय, त्याने हजरतबल दर्गा, शंकराचार्य हिल, दाल लेक आणि मुघल गार्डनलाही भेट दिली.
हिंदुस्थानात आगमन होताच, त्याने बाजारातून हिंदुस्थानी सिम कार्ड मिळवले, ज्यामुळे त्याच्या हालचालींबद्दलचा संशय अधिकच वाढला आहे.
त्याच्या ब्राउझिंग हिस्ट्रीमध्ये सीआरपीएफची तैनाती, कलम 370 रद्द करणे इत्यादींशी संबंधित शोध (Searches) दिसून आले आहेत. सुरक्षा यंत्रणा तो हिस्ट्री डिलीट केली आहे की नाही, हे देखील शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
चौकशीदरम्यान, हूने व्हिसा नियमांच्या उल्लंघनाबद्दल आपल्याला काही माहित नसल्याचे म्हटले आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. परंतु अधिकारी त्याच्या संशयास्पद हालचालींमागील सत्य उघड करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याने तपासकर्त्यांना सांगितले की, त्याने बॉस्टन विद्यापीठातून भौतिकशास्त्र (Physics) चा अभ्यास केला आहे आणि गेल्या नऊ वर्षांपासून तो अमेरिकेत राहत आहे. त्याने दावा केला की, तो प्रवासाचा शौकीन (Travel Enthusiast) आहे आणि त्याच्या पासपोर्टवर अमेरिका, न्यूझीलंड, ब्राझील, फिजी आणि हाँगकाँगसारख्या ठिकाणांना भेट दिल्याचा उल्लेख आहे.
हू काँगताईला चौकशीसाठी श्रीनगर विमानतळाजवळील बडगाम जिल्ह्यातील हुमहामा (Humhama) पोलीस चौकीवर नेण्यात आले आहे, जिथे अधिकारी हिंदुस्थानात त्याच्या संशयास्पद हालचालींमागील गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.


























































