
वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर विनापरवानगी नाव, छायाचित्रांचा वापर केला जात आहे. यामुळे माझी प्रतिमा मलीन होत आहे, असे सांगत व्यक्तिमत्त्व हक्क संरक्षणासाठी ज्युनिअर एनटीआर यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. एनटीआर यांच्या वकिलाने कोर्टात दावा केला आहे की, काही वेबसाईट्स आणि सोशल मीडिया अकाऊंटस्वर ज्युनिअर एनटीआरचा विनापरवानगी फोटो, व्हिडीओची विक्री केली जात असून ती प्रसारित केली जात आहे. यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्व हक्काचे सरळ सरळ उल्लंघन होत आहे. दिल्ली हायकोर्टाने याची गंभीर दखल घेतली असून पुढील सुनावणी 22 डिसेंबरला होणार आहे.
हिंदुस्थानी नागरिकांना टार्गेट करू नका!
चीनला जाणाऱ्या नागरिकांसाठी हिंदुस्थानने एक अधिसूचना जारी केली आहे. अरुणाचल प्रदेशच्या एका महिलेला शांघाय विमानतळावर थांबवल्याच्या घटनेच्या दोन आठवडय़ांनंतर केंद्र सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे. चिनी अधिकाऱ्यांनी या महिलेचा पासपोर्ट अधिकृत मानण्यास नकार दिला होता. विदेश मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जायसवाल यांनी म्हटले की, आम्हाला अपेक्षा आहे की, चिनी अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन द्यायला हवे की, ते विमानतळावर हिंदुस्थानी नागरिकांना टार्गेट करणार नाही, बेकायदेशीरपणे नागरिकांना ताब्यात घेणार नाहीत. त्यांना त्रास देणार नाहीत. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाससंबंधी नियमांचे उल्लंघन करणार नाहीत, असे जायसवाल म्हणाले.
जपानमध्ये भूकंप, 33 जण जखमी
जपान सोमवारी मध्यरात्री शक्तिशाली भूकंपाने हादरले. या भूकंपाची रिश्टर स्केल तीव्रता 7.5 इतकी होती. या भूकंपामध्ये 33 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू अओमारी प्रांतापासून 80 किलोमीर दूर 54 किलोमीटर खोल होता. भूकंपानंतर जपानच्या हवामान एजन्सी (जेएमए) ने उत्तरपूर्वी किनाऱ्यावर 3 मीटर म्हणजेच 10 फुटांपर्यंत उंच लाटा उसळण्याचा अलर्ट दिला. मंगळवारी सकाळपर्यंत हा अलर्ट देण्यात आला होता. या भूकंपात 33 लोक जखमी झाले असून अनेक जण खाली कोसळल्याने जखमी झाले. जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांनी भूकंपाचे नुकसान मोजण्यासाठी एक आपत्कालीन दलाची स्थापना केली.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकिस्तानावर मेहेरबान
आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ) सध्या पाकिस्तानवर चांगलेच मेहेरबान झालेले दिसत आहे. पाकिस्तानमध्ये आर्थिक अस्थिरता आणि सुधारणांची कमी असूनही आयएमएफने पाकिस्तानला 1.2 अब्ज डॉलरचा नवीन फंड दिला आहे. ही रक्कम पाकिस्तानची विदेशी मुद्रा भंडार (परकीय गंगाजळी) मजबूत करण्यासाठी आणि महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी जारी केली आहे. 1.2 अब्ज डॉलरची रक्कम ही दोन कार्यक्रमांतर्गत देण्यात आली आहे. याचा उद्देश देशातील आर्थिक सुधारणा करणे आणि जलवायू परिवर्तनाचा परिणाम कमी करणे हा आहे. वॉशिंग्टन येथील संस्थेकडून पाकिस्तानला आतापर्यंत एकूण 3.3 अब्ज डॉलर देण्यात आले आहे.




























































