
‘अरे माणसा माणसा कधी होशील माणूस?’ थोर कवयित्री बहिणाबाईंच्या या प्रश्नाचे आजच्या काळातील मूर्तिमंत उत्तर हे डॉ. बाबा आढाव होत. सर्वसामान्य माणसाबद्दल जिव्हाळा, आपुलकी आयुष्यभर जपणारे बाबा यांनी वयाच्या 95 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तेव्हा लाखो कष्टकरी गोरगरीबांचे बाबा हरपले, अशी लोकभावना व्यक्त झाली ती साहजिकच होती. हमाल, कष्टकरी, मजूर, कामगार यांच्यासाठी लढणारे डॉ. बाबा आढाव यांना आंदोलने, मोर्चे प्रकरणात तब्बल 52 वेळा तुरुंगवास भोगावा लागला. आपल्या 95 वर्षांच्या आयुष्यातील प्रदीर्घकाळ बाबांनी समाजातील पीडित शोषितांसाठी आवाज उठवला. 1942 चे ‘चले जाव’ ते गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुकांनंतर निवडणुकीतील गैरप्रकाराविरोधात भिडेवाडा येथे पुकारलेले आत्मक्लेश आंदोलन आणि माथाडी कायद्यातील बदलांविरोधात अलीकडेच केलेले आंदोलन अशी तब्बल 80 वर्षे बाबांनी वेगवेगळय़ा प्र्रश्नांवर आंदोलने केली. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर बाबांच्या आईने सेवासदनचा अभ्यासक्रम पूर्ण करून मोठय़ा जिद्दीने चारही भावंडांना मोठे करून शिक्षण दिले. 1 जून 1930 रोजीचा जन्म असलेल्या बाबांनी पुणे नगरपालिकेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण आणि शिवाजी मराठामधून हायस्कूल पूर्ण केले. त्यानंतर रसायनशास्त्र्ाात बीएससी पूर्ण करून आयुर्वेद महाविद्यालयातून पदवी घेतली. नाना पेठेतील निवासस्थानी दवाखानाही सुरू केला. तेथून हमालांच्या प्रश्नावर बाबांनी आंदोलन करत तुरुंगवासही भोगला. ‘हमाल पंचायत’ या पहिल्या असंघटित कामगार संघटनेची स्थापना तेव्हाच केली.
सन 1945 मध्ये साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांनाही प्रवेश मिळावा यासाठी उपोषण सुरू केलं होतं. तेव्हापासून जनतेच्या प्रश्नासाठी केल्या गेलेल्या प्रत्येक आंदोलनात बाबा आढाव यांचा सहभाग असे. पानशेतच्या पुरात पुण्यात अनेक गरीबांची घरे वाहून गेली. विस्थापित झालेल्या काहींना न्याय मिळाला, तर काही लोक न्यायासाठी झगडत होते. त्यांना कुणीच वाली नव्हता. तेव्हा बाबांमुळे त्या लोकांना आशेचे किरण दिसले. बाबा आढाव यांनी थेट मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची गाडी अडवत या प्रश्नावर आवाज उठवला. पुनर्वसनाचा प्रश्न फक्त पुण्यापुरता नसल्याचे जाणवल्यावर राज्यातील अशा विस्थापितांना बाबांनी एकत्र आणले. विस्थापितांच्या समस्येवर राज्यपातळीवर चर्चा घडवून आणली. अखेर 1969 मध्ये राज्य सरकारने पुनर्वसनाचा कायदा केला. महाराष्ट्रात 1972 साली भीषण दुष्काळ पडला होता. राज्यातील अनेक गावांमध्ये गावच्या पाणवठय़ावर दलितांना पाणी भरू दिले जात नव्हते, पिण्याच्या पाण्यासाठी गावातील लोकांपुढे हात पसरावे लागत होते. महाराष्ट्रातील सुमारे 700 गावे बाबांनी पायाखाली घातल्यानंतर हे कटू वास्तव लोकांपुढे आणले. तिथूनच ‘एक गाव, एक पाणवठा’ ही चळवळ डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केली.
समाजातील कष्टी, दुःखी घटकासाठी पोटतिडकीने लढणाऱया बाबांच्या चेहऱयावर कायम मंद स्मित हास्य असे. नेहमी अत्यंत मृदू स्वरात बोलणाऱया बाबांच्या आवाजाला आंदोलनात मात्र धार चढत असायची. डॉ. बाबा आढाव यांना चाफ्याची फुले खूप आवडत. आंदोलनाच्या ठिकाणीही सोबत आणलेला चाफा ते सर्वांना देत असत. बाबांनी कुठल्याही आंदोलनाला येऊन फक्त हजेरी लावली आणि लगेच निघाले असे कधीच घडत नसे. आंदोलनात सहभागी झाल्यानंतर ते धसास लागेपर्यंत बाबा तेथून जागचे हलत नसत. समाजात उपेक्षित असलेली कष्टकरी माणसे बाबांच्या नजरेतून कधीच सुटली नाहीत. म्हणूनच हमाल, रिक्षा चालक, कागद-काच-पत्रा वेचक, पथारी व्यावसायिक, बांधकाम मजूर, मोलकरीण अशा असंघटित कष्टकऱयांचा ते आवाज बनले. इतकेच नव्हे तर कष्टकऱयांना हक्काचे आणि पोटभर जेवण मिळावे यासाठी ‘कष्टाची भाकरी’ हे केंद्र भवानी पेठेत सुरू केले.
राष्ट्रसेवा दलाच्या मुशीत तयार झालेले बाबा आढाव हे महात्मा जोतिबा फुले यांच्या समतेच्या विचाराने भारलेले होते. महात्मा गांधींच्या मार्गावर वाटचाल करीत न्याय हक्कासाठी आयुष्यभर लढले. अशा डॉ. बाबा आढाव यांनी पुरस्काराचा सोस कधीच धरला नाही. याउलट बाबा म्हणत की, सरकारी पुरस्कार हा सरकारी अलंकार, म्हणजे सरकारी बेडी आहे आणि मला यात अडकायचे नाही. कष्टकऱयांशी असलेले नाते मला अबाधित ठेवायचे आहे, अशी भूमिका घेत आढाव यांनी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला होता. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी बाबांच्या नावाचा विचार झाला होता तेव्हा त्यांनी जाहीरपणे आपल्याच मार्गावरून जाण्याचा निर्धार ठेवला. कोरोनाच्या काळात आपापल्या गावी जाणारे लोंढे, कष्टकऱयांचे हाल ते पाहत होते. आपले काम पुढे सुरू ठेवण्यासाठी पुरस्कारामुळे प्रोत्साहन मिळते हे खरे आहे, परंतु सरकारी पुरस्काराच्या प्रोत्साहनाची मला गरज नाही. हजारो मजुरांचे लोंढे गावी परतत आहेत. त्यांच्या मुलांच्या शाळा थांबल्या आहेत. अशा परिस्थितीत मला सरकारी पुरस्कार नको, अशी भूमिका मांडणारे बाबा एक सच्चे ‘कार्यकर्ते’ होते. सध्याच्या भांडवली आणि मांडवली कार्यकर्त्यांच्या भाऊगर्दीतील फ्लेक्सबाजीच्या समाजसेवकांना पाहिले तर बाबांचे थोरपण अधिक अधोरेखित होते. कुठलीही अपेक्षा न ठेवता बाबांनी समाजासाठी आयुष्य घालविले. स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली मोठी माणसे एक एक करून मावळत आहेत. बाबांचे आयुष्य हे नव्या तरुणांसाठी प्रेरक ठरले तर समाजसेवेचा वसा असाच निरंतर सुरू राहील.


























































