India vs South Africa – विजयी सुरुवात!

>> संजय कऱ्हाडे

दक्षिण आफ्रिकेचा 101 धावांनी दणदणीत पराभव करून पाच टी ट्वेंटी सामन्याच्या मालिकेत हिंदुस्थानने जोरदार आघाडी घेतली. कालचा सामना जिंकण्यात गंभीरची रणनीती यशस्वी ठरली हे मान्य करावं लागेल. अर्शदीप आणि बुमरा या गोलंदाजांनी आणि अक्षर, हार्दिक, वरुण अन् शिवम या चार अष्टपैलूंनी सामना जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गंपू गंभीरचं अभिनंदन!

हार्दिक पांडय़ा, अक्षर आणि तिलकने केलेली फलंदाजी आनंददायी होती. पांडय़ाचे ड्राईव्हज् जोरकस अन् मस्त होते. अभिषेक, गिल आणि कप्तान सूर्याच्या अपयशावर पांघरुण घालणारे होते. संघाची पन्नाशीसुद्धा पूर्ण होण्याआधीच आपले तीन फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर पावणे दोनशे धावा फलकावर लावण्याचं सगळं श्रेय पांडय़ालाच!

कप्तान सूर्याचं अपयश आता बोचरं ठरू लागलंय अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच आणि कालचा मिळून उपकप्तान गिलने सहा टी ट्वेंटी सामन्यात 136 धावा केल्या आहेत. अभिषेकची ‘दे-दणा-दण’ भूमिकाही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी म्हणावी का?

जसप्रीत बुमराने त्याच्या तिसऱया आणि सामन्याच्या अकराव्या षटकात कारकिर्दीतला शंभरावा आणि एकशे एकवा बळी घेतला. त्यावर सुनील गावसकरचं म्हणणं होतं, ‘आता आपल्या कारकिर्दीत दोनशे बळींचा विक्रम पूर्ण करण्यासाठी बुमराला फक्त नव्याण्णव बळींची आवश्यकता आहे’! सुनीलच्या बोलण्याला विनोदाची झालर होती हे जरी खरं असलं तरी बुमरा एक अप्रतिम गोलंदाज आहे यात वाद नाही! मात्र, कालचा शंभरावा बळी त्याला नो-बॉलवर मिळाला असं म्हणायला जागा होती! टीव्ही पंचाने त्याच्या नो-बॉलकडे का दुर्लक्ष केलं हे न सोडवता येणारं कोडंच राहून गेलं. त्याहून आश्चर्याचं होतं ते सुनीलसह सर्वच समालोचकांनी यावर चर्चा करणं सपशेल टाळणं! अर्थात, त्यामुळे आफ्रिकेचा पराभव टळला नसता हे खरं. तरीही पंचाने केलेली चूक स्पष्ट करून दाखवणं समालोचकांचं कर्तव्य होतं असं वाटून गेलं! असो.

जितेश शर्माचंही कौतुक करावं लागेल. त्याने सामन्यात चार झेल घेतले. यष्टींमागे त्याने छान कामगिरी केली.

सूर्या-शुभमनला धावांचं वरदान मिळण्यासाठी शुभेच्छा!