
आगामी फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱया टी-20 वर्ल्ड कपचा थरार सामान्य क्रिकेटप्रेमींनाही अनुभवता यावा म्हणून आयसीसीने अवघ्या 100 रुपयांत तिकिटे उपलब्ध करून दिली आहेत. गुरुवारी तिकीट विक्रीचा पहिला टप्पा सुरू होताच क्रिकेटप्रेमींचा उत्साह केवळ हिंदुस्थानी संघाच्या सामन्यालाच दिसला. 15 फेब्रुवारीला कोलंबोत होणारा हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील लढतींची तिकिटे तासाभरात सोल्ड आऊट झाली. एवढेच नव्हे तर सुपर-एटमधील हिंदुस्थानचे पहिल्या गटातील अव्वल स्थान मानत क्रिकेटप्रेमींनी तिकिटे काढल्याचे दिसून आले आहे.
आजपासून आयसीसी टी-20 वर्ल्ड कपची तिकीट विक्रीचा पहिला टप्पा सुरू झाला. त्यात उपांत्य फेरी आणि अंतिम सामना वगळता सर्व तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली होती. 20 संघांचा सहभाग असलेल्या वेगवान क्रिकेटमध्ये एकूण 55 सामने खेळविले जाणार आहेत. त्यापैकी 53 सामन्यांची तब्बल 20 लाख तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. हिंदुस्थानातील सामन्यांचे किमान तिकीट 100 रुपये तर लंकेतील सामन्यांचे तिकीट 1000 लंकन रुपये ठेवण्यात आले आहेत.
चाहत्यांच्या पर्यटनाचीही काळजी
क्रिकेट स्पर्धेदरम्यान पर्यटनाचाही आनंद लुटता यावा म्हणून अनेक संघाच्या साखळी लढती एका किंवा दोन शहरांमध्ये विभागण्यात आल्या आहेत. म्हणजे सामन्यांच्या विश्रांतीदरम्यान क्रिकेटप्रेमींना पर्यटनाचाही आस्वाद घेता येईल. आयसीसीने चाहत्यांच्या पर्यटनाची चांगलीच काळजी घेतली असून नेपाळी संघाच्या सर्व लढती मुंबईत खेळविल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाचे सर्व साखळी सामने लंकेत असतील. पाकिस्तानही आपले सर्व सामने लंकेतच खेळणार आहे. बांगलादेश आणि इटली आपल्या तीन-तीन लढती कोलकात्यात खेळतील. न्यूझीलंडच्याही तीन साखळी लढती चेन्नईत रंगणार आहेत. यूएईचा संघ दिल्ली मुक्कामी तीन सामने खेळेल. या विचारपूवर्क कार्यक्रमामुळे यंदा परदेशी पर्यटक चांगल्या संख्येने वर्ल्ड कपला येण्याची शक्यता आयसीसीने वर्तवली आहे.
आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता यांनी क्रिकेटचे सामने परवडणाऱया किमतीत सर्वांना पाहता यावेत म्हणून तिकिटांचे दर 100 रुपयांपासून सुरू केले आहेत. चाहता कोणताही असो, कोणत्याही पार्श्वभूमीचा असो, त्याला जागतिक दर्जाच्या क्रिकेटचा थरार प्रत्यक्ष स्टेडियममध्ये अनुभवता आला पाहिजे, असे त्यांचे प्रामाणिक मत आहे. तिकिटांचे दर कमी असल्यामुळे नवख्या संघांच्या लढतींनाही प्रेक्षक मोठय़ा संख्येने येतील, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.























































