किल्ले रायगडसह 11 गडांचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा काढला जाऊ शकतो; संभाजीराजे यांचा पुरातत्व खात्याला धोकादायक इशारा

World Heritage Status of Raigad Fort, 10 Other Forts at Risk Sambhajiraje Warns Archaeology Department

अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण यामुळे किल्ले रायगडला मिळालेला जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात येऊन काढला जाऊ शकतो. यासंदर्भात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ाला केंद्रीय पुरातत्व खात्याचे महासंचालक सिंह यांनी सहमती दर्शवत केवळ रायगडच नव्हे तर इतर अकरा गडांचाही दर्जा काढला जाऊ शकतो, असा धोकादायक दुजोरा व्यक्त केला आहे.

दरम्यान, भविष्यात अशी अपमानास्पद वेळ आली तर त्यास पूर्णतः रोपवे कंपनी, तिला पाठीशी घालणारे लोक आणि डोळेझाक करणारा पुरातत्व विभाग जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिल्ली येथे भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट घेऊन दुर्गराज रायगडवर सुरू असलेल्या विविध संवर्धन कामांसह गडावरील अनधिकृत व्यावसायिक बांधकाम व अतिक्रमण याबाबत सविस्तर निवेदन दिले. यावेळी भीमा अजमेरा (संचालक, संवर्धन), सुंदर पॉल (संचालक, संवर्धन) व ए. एम. व्ही. सुब्रह्मण्यम (संचालक, स्मारके) हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रोपवे कंपनीकडून गडावर अनधिकृत व्यावसायिक बांधकामे करण्यात आली आहेत. रायगड विकास प्राधिकरणाने या बांधकामांबाबत पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी आक्षेप नोंदवला आहे. बांधकाम सुरू असताना पुरातत्व विभागाने काम थांबवण्याची नोटीस देऊनही ती डावलून काम पूर्ण केल्याचे निदर्शनास आणून देत, या कंपनीवर कायदेशीर कारवाई का केली जात नाही, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला. यास पुरातत्व विभागाचे महासंचालक व इतर अधिकारी कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत.

शासकीय रोपवे उभारणार

संभाजीराजे म्हणाले की, या खासगी कंपनीची मुजोरी मोडीत काढण्यासाठी व जनतेला सुरक्षित व किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी रायगड विकास प्राधिकरणमार्फत शासकीय रोपवे उभारणे प्रस्तावित आहे. यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. हा रोपवे युनेस्कोच्या मानांकनानुसार जागतिक दर्जाचा असेल. प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित, किफायतशीर व रायगडच्या सौंदर्यास अनुकूल असे स्वरूप त्यास दिले जाईल, असे आश्वासन संभाजीराजे यांनी दिले.