विद्यार्थ्यांच्या अंगावर स्लॅबचे तुकडे कोसळले, देवळालीच्या जीर्ण शाळेबाबत प्रशासनाचा निष्काळजीपणा

Ceiling Slab Chunks Collapse on Students at Deolali School; Administration Slammed for Negligence

शेटेवाडी परिसरातील जिल्हा परिषद शाळेची इमारत अक्षरशः मृत्यूचा सापळा बनली आहे. आज पुन्हा एकदा वर्गात शिकत असताना विद्यार्थ्यांच्या अंगावर स्लॅबचे तुकडे कोसळल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. सुदैवाने शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला.

शाळा प्रभाग क्रमांक 5 मधील शाळेची अवस्था गलिच्छ झाली असून, स्लॅब कधी कोसळेल याची कायम भीतीच असते. दोन वर्षांपूर्वी अशीच दुर्घटना घडूनही प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्याची पुनरावृत्ती होत आज पुन्हा विद्यार्थ्यांच्या अंगावर स्लॅबचे तुकडे कोसळल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

शाळेची 14 गुंठे जागा जिल्हा परिषदेची असून, इमारत नगरपालिकेची आहे. चार दशकांतच मोडकळीस आलेल्या या इमारतीने निकृष्ट कामाची पोलखोल केली आहे. आता ती पाडण्याशिवाय दुसरा मार्ग शिल्लक नाही, हे उघडच आहे. पण दोन सरकारी यंत्रणांचे तांत्रिक वाद विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. जुनी इमारत पाडण्यासाठी नगरपालिका निर्णय देणार, तेव्हा जिल्हा परिषद नवीन इमारतीचा प्रस्ताव मंजूर करणार. तोपर्यंत विद्यार्थ्यांचे जीव मात्र धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.

आजच्या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि नगरपालिकेच्या अधिकाऱयांवर फोनवरून संताप व्यक्त केला. तसेच तातडीने शाळेचे बांधकाम करण्यात आले नाही, तर संबंधित अधिकाऱयांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा दिला.