
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उकरून काढला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा आतापर्यंत वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भूमिका ठेवली आहे. भाजपची भूमिका वेगळ्या विदर्भाच्या बाजूची असल्याचे ते म्हणाले होते. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून वेगळ्या विदर्भाची मागणी मान्य होऊ शकत नाही, असे ठामपणे म्हटले आहे. ते नागपूर येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नागपूर ही आपल्या राज्याची उपराजधानी आहे. नागपूरमध्ये अधिवेशन हे विदर्भाच्या व्यथांसाठी, विदर्भाच्या प्रश्नांसाठी घ्यावे असा एक प्रघात आहे. या सगळ्या काळामध्ये विदर्भाच्या विषयावर किती काळ चर्चा झाली? आजपर्यंत जर कामकाज बघितले तर सरकारकडून महापालिका निवडणुका लक्षात ठेऊन घोषणा केल्या गेल्या. पण विदर्भासाठी काय केले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही. विदर्भ हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भातील आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले म्हणून त्यांच्या कच्छपी जे लागलेत त्यांची भूमिका काय आहे? सरकारने जाहीर केले पाहिजे की महाराष्ट्र अखंड ठेऊ इच्छिता की तुकडे पाडू इच्छिता?
हा महाराष्ट्राच्या मुळावर आघात करण्याचा विषय आहे. जो कुणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करतो तो महाराष्ट्राचा नाही. त्यांनी आतापर्यंतच्या अधिवेशनात विदर्भासाठी काय प्रश्न मांडले, हे वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांनी स्पष्ट करावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.





























































