
हिंदुस्थान आपले हवेच्या गुणवत्तेचे मानक स्वतः ठरवतो आणि जागतिक क्रमवारी (रँकिंग) अधिकृत नाहीत, असं केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह म्हणाले आहेत. यावरूनच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. X वर एक पोस्ट करत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “वाह! प्रदूषण रोखायची काय भन्नाट पद्धत आहे ही. फक्त निकष आणि मापदंड बदलून टाका. जसे त्यांनी जीडीपीसाठी, महामार्ग बांधकामासाठी आणि त्यांच्या बाकी सगळ्या अपयशांसाठी केलंय तसंच.”
काय म्हणाले होते कीर्ती वर्धन सिंह?
राज्यसभेत बोलताना केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह म्हणाले होते की, “हिंदुस्थान आपले हवेच्या गुणवत्तेचे मानक स्वतः ठरवतो आणि जागतिक क्रमवारी (रँकिंग) अधिकृत नाहीत. विविध संस्थांकडून दाखवल्या जाणाऱ्या जागतिक हवा गुणवत्ता क्रमवारी या कोणत्याही अधिकृत प्राधिकाऱ्याकडून केल्या जात नाहीत आणि जागतिक आरोग्य संघटनाचे (WHO) हवेच्या गुणवत्तेचे मार्गदर्शक तत्त्वे फक्त सल्लागार स्वरूपाचे आहेत, ते बंधनकारक मानके नाहीत.”


























































