
नाशिकच्या तपोवनातील झाडे तोडण्याविरोधात आंदोलनाचा वणवा पेटला असताना राष्ट्रीय हरित लवादाने वृक्षतोडीला 15 जानेवारीपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया होईपर्यंत प्रशासनाला या ठिकाणचे एकही झाड तोडता येणार नाही. असे असतानाच पालिकेने मलनिस्सारण केंद्र विस्तारीकरणाच्या नावाखाली तब्बल बाराशे झाडांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
कुंभमेळ्यानिमित्त साधुग्रामचे नाव पुढे करून अठराशेहून अधिक झाडे तोडून माईस हब उभारण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. याविरोधात तीन आठवडय़ांपासून नाशिककरांनी आंदोलनाचा धडाका लावला आहे. याला राज्यभरातून सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर तपोवनातील वृक्षतोडीविरोधात हरित लवादामधे याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीत लवादाने वृक्षतोडीला स्थगिती दिली. हा अंतिम आदेश नाही तर अंतरिम आदेश असल्याचे वकील श्रीराम पिंगळे यांनी सांगितले. झाडे तोडण्याआधी न्यायिक प्रक्रिया राबवायला हवी, ती न राबवताच वृक्षतोड केली जात आहे. एकदा तोडलेल्या वृक्षांचं पुनर्रोपण नीट केलं जातं नाही, वृक्षतोडीला आमचा विरोध आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
या ठिकाणी झाली कत्तल!
महापालिकेच्या आगरटाकळी, पंचक, चेहेडी व तपोवन येथील मलनिस्सारण केंद्रांच्या विस्तारीकरणासाठी 1 हजार 728 झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला चार महिन्यांपूर्वीच परवानगी देण्यात आली. त्यापैकी 458 झाडे वाचवली, उर्वरित 1 हजार 270 झाडे तोडली आहेत, त्यात पंचक येथील 521, चेहेडी येथील 275, आगरटाकळी येथील 154, तपोवनातील 447 झाडांचा समावेश आहे. वृक्षतोडीच्या बदल्यात मलनिस्सारण विभागाकडून 1 कोटी 76 लाखांची भरपाई घेतली आहे, या निधीचा वापर पर्यावरणीय प्रकल्पांसाठी केला जाणार आहे, त्यातून 17 हजार 680 झाडे लावू, असा दावा महापालिकेने केला आहे.
वन विभागाने चारशे झाडे तोडली
महापालिकेपाठोपाठ आता वन जपण्याची जबाबदारी असलेला वन विभागही झाडांच्या मुळावर उठला आहे. गंगापूर रस्त्यावरील जेआयटी महाविद्यालयाजवळ वनविभागाच्या 10 एकरावरील रोपवाटिकेत 400 झाडांची कत्तल केली गेली.
































































