सिडनीच्या बीचवर दहशतवादी हल्ल्यात 12 ठार; 26 जखमी, ज्यू धर्मियांच्या उत्सवात अंदाधुंद गोळीबार

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात बॉण्डी समुद्र किनाऱ्यावर सण साजरा करणाऱ्या यहुदी नागरिकांवर भ्याड दहशतवादी हल्ला झाला. दोन दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला असून एकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. जगभरातून हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, यहुदी नागरिकांचा हनुक्का हा सण ऑस्ट्रेलियातील सिडनी आणि मेलबोर्न या शहरांमध्ये मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. सूर्य मावळल्यानंतर हा सण साजरा करतात. त्याची सुरुवात आजपासून झाली. रविवारी रात्री मोठय़ा प्रमाणावर यहुदी नागरिक सण साजरा करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर गोळा झाले होते. अचानक या नागरिकांवर बेछूट गोळीबार सुरू झाला. त्यात काही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही लहान मुलेदेखील गोळी लागल्यामुळे जखमी झाली. सुरुवातीला ही गोळीबाराची घटना असल्याचे सांगण्यात आले. मात्र हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट करून यहुदी नागरिकांना लक्ष्य करण्यात आल्याचे सिडनी पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला असून दुसरा दहशतवादी जखमी झाला आहे. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही.

हिंदुस्थानात सुरक्षा वाढवली

यहुदी नागरिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर हिंदुस्थानातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरूसह काही प्रमुख शहरांमध्ये यहुदी नारिक मोठय़ा प्रमाणावर राहतात, त्यांचे सण आणि संबंधित संस्थांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असून तेथे सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

आम्ही ऑस्ट्रेलियाच्या

नागरिकांसोबत – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. सोशल मीडियावर त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले की, मी ऑस्ट्रेलियाच्या बाँडी समुद्र किनाऱ्यावर झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. हनुक्का हा सण साजरा करणाऱ्या यहुदी लोकांना हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. आपल्या आप्तेष्टांना ज्यांनी गमाविले, अशा कुटुंबियांप्रती हिंदुस्थानी जनतेच्या वतीने मी सहानुभूती आणि संवेदना व्यक्त करतो.

द्वेष, हिंसा आणि दहशतवादाला ऑस्ट्रेलियात थारा नाही – ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीज

दहशतवादी हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज यांनी देशातील नागरिकांना संबोधित केले. ते म्हणाले, यहुदी लोकांवर केलेला हल्ला हा प्रत्येक ऑस्ट्रेलियन नागरिकावर केलेला हल्ला आहे. हल्लेखोरांनी यहुदींच्या पवित्र सणाचा दिवस हल्ल्यासाठी निवडला. आमच्या देशात द्वेष, हिंसाचार आणि दहशतवादाला थारा नाही. आम्ही दहशतवादाला पूर्णपणे संपवू.

माजी क्रिकेटपटू वॉन बचावला

इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. त्याने एका रेस्टॉरंटमध्ये लपून प्राण वाचविले. यासंदर्भात त्याने एक्सवर पोस्ट लिहून भावना व्यक्त केली.

तीन संशयितांना अटक

सिडनी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. नवीद अक्रम नावाच्या तरुणाला जखमी दहशतवाद्यासोबतच अटक केली होती. तर एक पुरुष आणि एका महिलेला बॉनिरीग भागातून अटक करण्यात आली. त्यांचा आजच्या गोळीबाराशी थेट संबंध आहे. त्यांची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास करण्यात येत आहे.

29 वर्षांनी ऑस्ट्रेलियात मास शूटिंग

ऑस्ट्रेलियात अशा मास शूटिंगच्या घटना क्वचित घडतात. यापूर्वी 1996मध्ये पोर्ट आर्थर येथे एका जणाने गोळीबार केला होता. त्यात 35 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एप्रिल 2024मध्ये एकाने चाकूने हल्ला केला होता. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. या हल्लेखोराला गोळी घालून ठार करण्यात आले होते.

समोर मृत्यूचे तांडव आणि तो दहशतवाद्याला भिडला

दहशतवादी बेछूट गोळीबार करत असताना अहमद अल अहमद नावाच्या व्यक्तीने कारच्या मागे लपून संधी साधत जिवावर उदार होत दहशतवाद्यावर झडप घातली आणि दहशतवाद्याच्या हातातून रायफल हिसकावून घेतली. त्यांना रायफल चालवता येत नाही. त्यामुळे त्यांनी दहशतवाद्याकडे ती रोखून धरली. मात्र त्याच वेळी दुसऱ्या दहशतवाद्याने त्यांच्यावर पाठीमागून गोळी मारली. त्यात अहमद हे जखमी झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

इस्रायल पंतप्रधानांची ऑस्ट्रेलियावर नाराजी

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ऑस्ट्रेलियात यहुदीविरोधी घटनांबाबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांना यापूर्वी अलर्ट दिला होता. ऑस्ट्रेलियन सरकारची धोरणे यहुदीविरोधी भावनांना प्रोत्साहन देत असल्याचे पत्र 17 ऑगस्ट रोजी दिले होते, असा दावा नेतान्याहू यांनी केला आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हर्जोग यांनीही तीव्र निषेध व्यक्त करताना ऑस्ट्रेलियावर यहुदीविरोधी भावना वाढत असल्याबाबत ठपका ठेवला आहे.