
सातारा जिल्ह्यातील सावरी गावात एमडी ड्रग्जचा मोठा कारखाना मुंबई क्राईम ब्रँचने उघड केला, पण फडणवीस सरकार हे प्रकरण गांभिर्याने घेत नाही. एवढा मोठा ड्रग्जचा कारखाना असल्याचे उघड झाले असताना अद्याप यामागील खऱ्या सूत्रधारावर कारवाई केलेली नाही. या सावरी गावाजवळच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे हे गाव असून त्यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांचा हा काळा धंदा सुरू होता. सावरी गावातील ड्रग्जचा कारखाना व उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांचे लागेबांधे असल्यानेच सरकार ठोस कारवाई करत नाही, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
सावरी गावात एवढा मोठा ड्रग्जचा कारखाना सुरु होता त्याची कल्पना सातारा पोलिसांना होती पण त्यांनी कारवाई केली नाही. मुंबई क्राईम ब्रँचने ही कारवाई केली. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. हे तेच पोलीस अधीक्षक आहेत ज्यांनी आंतरावली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना मराठा समाजाच्या माता भगिनींवर अमानुष लाठीहल्ला केला होता. साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणी शिंदे व फडणवीस यांची मिलीभगत आहे का? या प्रश्नाचे उत्तर फडणवीस व शिंदे यांनी दिले पाहिजे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सातारा ड्रग्ज प्रकरणावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी निवडणुक आयोगाची मदत घेण्यात आली व महानगरपालिका निवडणुकांची घाईघाईने घोषणा करण्यात आली. मतदार याद्या अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. १५ तारखेला मतदार याद्या जाहीर करणार होते पण आता बुथनिहाय २७ तारखेला या मतदार याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास २३ तारखेपासून सुरुवात होत आहे आणि उमेदवारी अर्जावर उमेदवाराला तसेच सुचक, व अनुमोदक यांना त्यांचे मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक लिहावा लागतो पण मतदार याद्याच नाहीत तर अर्ज कसे भरणार? असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घिसाडघाईने जाहीर करून निवडणूक आयोगाने बौद्धिक दिवाळखोरी दाखवली आहे.
कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न
महायुती सरकारमधील मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट निघालेले आहे, पण अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. न्यायालयाचा निकाल येताच कोकाटे नॉट रिचेबल झाले आहेत. सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पार्थ पवार यांना जसे वाचवले तसे कोकाटे यांनाही वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. राहुल गांधी व सुनिल केदार या काँग्रेस नेत्यांविरोधात कोर्टाचा निकाल येताच २४ तासाच्या आत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती पण कोकाटे सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्यांना वाचवले जात आहे, ही लोकशाहीची क्रूर थट्टा असून देवेंद्र फडणवीस हे गप्प बसले आहेत असे सपकाळ म्हणाले.
मुंडे दिल्लीत थेट, घेतली शहांची भेट; अजित पवार गटाला मागमूसही नाही, कोकाटेंवर टांगती तलवार
वाचा सविस्तर – https://t.co/dywz0Fs8St pic.twitter.com/h2IhP3IqWN
— Saamana Online (@SaamanaOnline) December 17, 2025


























































