
संसदेतलं वादळ आज चहाच्या पेल्यात शमलं. अधिवेशनात एकमेकांवर आगपाखड करणारे सत्ताधारी आणि विरोधक लोकसभा अध्यक्षांच्या दालनात मनमोकळा संवाद साधताना दिसले. यावेळी झालेल्या चहापानाला कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते एकमेकांच्या बाजूला बसूल चर्चा करत होते. इतकेच नव्हे तर परस्परांच्या चर्चेतून झालेल्या विनोदावरून खळाखळा हसतानाही दिसले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. या अधिवेशनात शक्ती आणि रामजी विधेयकाबरोबरच निवडणूक कार्यक्रमातील सुधारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार हंगामा झाला होता. विधेयकाचे कागद फाडून भिरकावण्यापर्यंत विरोधी खासदार आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. सत्ताधाऱयांनी विरोधकांवर टीकाटिप्पण्या केल्या होत्या. मात्र आज अधिवेशन संपताच दोन्ही बाजूंची मंडळी चहापानानिमित्त एकत्र आली.
इथियोपियाचे सौंदर्य आणि वायनाडची निळी हळद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच तीन देशांचा दौरा केला. त्यातील इथियोपिया दौऱयाची माहिती मोदी यांनी सर्वांना दिली. इथियोपियाच्या राजधानीच्या सौंदर्याचे वर्णन त्यांनी केले. प्रियंका गांधीनींही ते शहर फारच सुंदर आहे असे सांगत दुजोरा दिला. अशा वातावरणात चर्चा रंगत गेली आणि राजकारणविरहित एकेक विषय उलगडत गेला. प्रियंका गांधी यांनी वायनाडमधील निळ्या हळदीबद्दल सांगितले. त्या हळदीचा आपण नियमित वापर करतो, त्यामुळे गळ्याला आराम मिळतो. प्रदूषणामुळे गळ्याला होणाऱया त्रासात ती हळद उत्तम आहे, असे प्रियंका गांधी यांनी सांगताच खासदारांच्या चेहऱयांवर स्मितहास्य उमटले. कारण हिवाळी अधिवेशनात प्रियंका गांधी यांनी आपल्या भाषणांमधून सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता.
आम्ही घोषणाही देतो आणि भाषणेही ठोकतो!
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी खूप कमी होता, आणखी काही काळ अधिवेशन चालायला हवे होते असे समाजवादी पार्टीचे खासदार धर्मेंद्र यादव यावेळी म्हणाले. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी, घोषणाबाजी करायला अधिक काळ चालायला हवे होते का? असे म्हणत स्मितहास्य केले. प्रियांका गांधी यांनी क्षणाचाही वेळ न दवडता म्हटले की, आम्ही घोषणाही देतो आणि भाषणेही ठोकतो. त्या विधानावर बैठकीत उपस्थित सर्वच मंडळी मनसोक्त हसली.
ओम बिर्ला यांनी त्यांच्या दालनात चहापान झाले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी जर्मनीच्या दौऱयावर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत विरोधकांच्या नेतृत्वाची कमान प्रियांका गांधी यांनी सांभाळली. पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, ओम बिर्ला आणि प्रियांका गांधी चहापानाला एकत्र बसले होते.



























































