
अवकाळीसह सरासरीपेक्षा जास्त झालेल्या मोसमी पावसामुळे टोमॅटोचे नुकसान होऊन यंदा पूर्ण हंगाम उत्पादकांना आर्थिक अडचणीत ढकलणारा ठरला. मात्र, पावसाळ्याच्या शेवटी लागवड केलेला नवा टोमॅटो आता दिंडोरी बाजार समितीत दाखल झाला आहे. कमी आवकेमुळे तो चांगलाच तेजीत आला आहे. त्याला आज प्रतिकिलो 56 रुपये असा उच्चांकी भाव पुकारला गेल्याने उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत टोमॅटोची मागणी वाढल्याने समाधानकारक भाव मिळू लागला आहे. आठवडय़ापूर्वी खोरी फाटा येथे कमाल दर 22 व सरासरी 16 रुपये किलो होता. तो वाढत वाढत आज कमाल 56 आणि सरासरी 33 वर पोहोचला आहे. आवक 3 हजार 445 क्विंटल होती. जिह्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये या टोमॅटोची आवक 400 ते 500 क्विंटल व कमाल दर 35 ते 37 रुपये किलोदरम्यान आहे.
निर्यात ठप्पच
जिह्यातील सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत ऑक्टोबरपर्यंत मोठय़ा प्रमाणावर टोमॅटोची आवक होते. यंदा ती सुमारे तीन लाख व्रेट म्हणजेच साठ हजार क्विंटलपर्यंत पोहोचली होती. तेथून चांगल्या दर्जाच्या टोमॅटोची दुबई, बांगलादेशासह आखाती देशात निर्यात होत असते. मात्र, आता आवक कमी असल्याने निर्यात ठप्पच आहे.
मध्य प्रदेश, गुजरातमुळे फटका बसणार
यंदा लांबलेल्या पावसाने मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील टोमॅटो जवळपास महिनाभर आधीच बाजारात दाखल झाला आहे. येत्या काही दिवसांत त्यांचे उत्पादन देशांतर्गत बाजारात येऊन आपल्या टोमॅटोच्या स्पर्धेत उतरेल. परिणामी दरावर परिणाम होतील अशी चिन्हे आहेत.
लाल कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी हवालदील
जिह्यातील बाजार समित्यांमध्ये आज आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड आवकेमुळे लाल कांद्याच्या दरात क्विंटलमागे 200 ते 900 रुपयांची घसरण झाली. कमाल भाव 1700 ते 2600 आणि सरासरी 1300 ते 1811 रुपये मिळाल्याने उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. दरवर्षी दिवाळीनंतर लाल कांदा बाजारात येतो. मात्र, यावर्षी लांबलेला मोसमी पाऊस आणि अवकाळीचा कहर यामुळे रोपे खराब झाली. हा कांदा बाजारात नोव्हेंबर अखेरीपासून थोडय़ा फार प्रमाणात येण्यास सुरुवात झाली. आता आवक वाढू लागल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.


























































