
पालघर जिह्यात जमावाकडून झालेल्या साधूंच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज चार आरोपींना दणका दिला. आरोपींविरोधात पुरेसे प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती नीला गोखले यांनी आरोपींचा जामीन फेटाळून लावला. राजेश राव, सुनील दळवी, सजनुआ बुरकुड आणि विनोद राव अशी त्या आरोपींची नावे आहेत.
14 एप्रिल 2020 रोजी, कोविड लॉकडाऊनदरम्यान, एका कारमधून प्रवास करणाऱया दोन साधूंवर आणि त्यांच्या चालकावर मुलांचे अपहरणकर्ते असल्याच्या संशयावरून गावकऱयांच्या जमावाने हल्ला केला. या तिघांचा मृत्यू झाला. घटनास्थळी त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या पोलीस पथकावरही जमावाने हल्ला केला. 126 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला. या प्रकरणी जामीन मिळावा म्हणून आरोपीनी हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. आतापर्यंत या प्रकरणातील 42 आरोपींना जामीन मंजूर झाला आहे त्यामुळे आरोपींनी समानतेच्या आधारावर जामिनाची मागणी केली होती. मात्र हायकोर्टाने त्यांचा जामीन फेटाळला.




























































