छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळला; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध राबवलेल्या मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेला शस्त्रसाठा, स्फोटके आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

सुकमा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य करून मोठी जीवितहानी घडवून आणण्याच्या हेतूने हे साहित्य लपवले होते. मात्र, सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे हा घातपाताचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी 1 बोल्ट-ॲक्शन रायफल, 3 मुझल-लोडिंग गन आणि 1 ’12-बोअर’ सिंगल बॅरल रायफल जप्त केली. याशिवाय 7.62 मिमी SLR रायफलची 150 जिवंत काडतुसे, 5.56 मिमी INSAS रायफलची 150 जिवंत काडतुसे, 303 रायफलची 100 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने हे साहित्य साठवले होते. या जप्तीमुळे नक्षलवाद्यांच्या कारवायांना मोठा फटका बसला असून परिसरातील शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे, अशी माहिती सुकमा पोलिसांनी या कारवाईनंतर दिली.