
पुत्रदा एकादशीनिमित्त बुधवारी पंढरीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दोन लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली. तसेच वर्षाअखेर आणि नवीन वर्षाचा शुभारंभ श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाने करण्यासाठी भाविक पसंती देत आहेत. त्यामुळे आलेल्या भाविकांनी पंढरीनगरी गजबजली आहे.
दरम्यान, सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीकडूनदेखील जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावे म्हणून प्रयत्नशील आहेत. पंढरीत भाविकांची गर्दी वाढू लागल्याने चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, प्रदक्षिणा रोड, भक्तिमार्ग, स्टेशन रोड गजबजला आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेला भाविक हा चंद्रभागा स्नानासाठी प्राधान्य देत आहे. तसेच श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहे. यामुळे दर्शनरांग मंदिरापासून तीन
किमीपर्यंत दूर गेली आहे. चार ते पाच तासांचा कालावधी दर्शनासाठी लागत आहे. तर, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, अनेक भाविक हे मुखदर्शन घेण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे मुखदर्शन घेण्यासाठीदेखील स्वतंत्र रांग उभारण्यात आली आहे. मुखदर्शनासाठीदेखील तीन तासांचा कालावधी लागत असल्याचे भाविकांकडून सांगण्यात येते. प्रासादिक साहित्य खरेदीसाठीदेखील भाविक पसंती देत आहेत. यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.
विठ्ठल दर्शनाने होणार नववर्षाचा शुभारंभ
श्री विठ्ठलभक्त हे नवीन वर्षाचा शुभारंभ विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाने करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे असे भाविक पंढरपूर येथे मठ, धर्मशाळा, भक्तनिवास व हॉटेलमध्ये वास्तव्य करत आहेत. त्यामुळे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी लाखो भाविकांचे वास्तव्य पंढरपुरात असणार असल्याचे सांगण्यात येते.



























































