
राज्यात निवडणूकांचे रणकंदन सुरु असताना, महायुतीमधून तब्बल 70 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या बिनविरोध निवडणुकांच्या मुद्द्यावर आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यामुळेच ही लोकशाहीची थट्टा होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या उमेदवारांच्या प्रक्रियेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार भास्कर जाधव यांनी सडकून टीका केली आहे. त्यांनी बिनविरोध निवडून आलेले उमेदवार सरकारच्या कामावर खुश आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भास्कर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधताना, या बिनविरोध निवडीवरून सरकारलाच खडे बोल सुनावले. या निवडणुका किंवा हे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार हे सरकारच्या कामकाजावर खुश आहेत का? असा परखड सवालही त्यांनी विचारला. निवडूण आलेल्या उमेदवारांच्या विरोधात ज्या उमेदवारांनी अर्ज भरले, त्या उमेदवारांना धाक धपटशाही दाखवून किंवा त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार करून विकत घेतले. किंबहुना काही उमेदवारांना खोलीत कोंडून ठेवून त्यांनी आपले उमेदवार बिनविरोध निवडून यावे यासाठी प्रय़त्न केले, असा आरोप जाधव यांनी केला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवरही जाधव यांनी निशाणा साधला. राहुल नार्वेकर हे केवळ एका मतदारसंघाचे आमदार आणि सभागृहाचे अध्यक्ष आहेत. तरी त्यांनी हरिभाऊ राठोड यांचे संरक्षण काढण्याची ऑर्डर दिली. त्यांना तो अधिकारचं नाहीये, असे जाधव म्हणाले. त्यामुळे यांनी बिनविरोध निवडलेले लोक विश्वासाने झालेले नाहीत. ज्या प्रकारे उमेदवारांना विकत घेतले जात आहे किंवा त्यांना धमकावले जात आहे, ते पाहता या बिनविरोध निवडीवर जनतेचा अजिबात विश्वास नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
































































