सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणुका जिंकू शकत नाही, अशा गुंडांशी सामना करण्याची शिवसेनेची परंपरा; पुण्यात संजय राऊत यांचं रोखठोक भाषण

सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणुका जिंकू शकत नाही, अशा गुंडांशी सामना करण्याची शिवसेनेची परंपरा आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पुणे येथील कोंढवा येथे प्रचार सभेला संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “माझी प्रकृती गेले काही महिने ठीक नाही आहे, दीड महिने मी रुग्णालयात होतो. त्याआधी तुरुंगात होतो. पण या सगळ्यांची न पर्वा करता, शिवसेनेचे काम करत राहणं, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे घेऊन जाणं आणि या कठीण परिस्थिती सुद्धा वसंत मोरे (उर्फ तात्या मोरे) शिवसैनिक जे संघर्ष करत आहेत, जी टक्कर देत आहेत, त्यांच्यामागे ठामपणे उभं राहणं, हे गेल्या अनेक वर्षांपासूनचं माझं काम आहे. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, डुप्लिकेट शिवसेना नाही. मशाली पेटलेल्या आहेत, या नुसत्या पेटलेल्या नाहीत, तर वेळ आली तर काय आणि कसं पेटवायचं, हे मशाली धरलेल्या हातांना पक्के माहित आहे.”

संजय राऊत म्हणाले, “पुण्यातील वातावरण गेले काही दिवस मी पाहत आहे. आज पुण्यात प्रवेश केला तेव्हा मला भीती वाटली. पुण्यात प्रवेश करायला, कुठून तरी कोयता गॅंग येईल आणि हल्ला करेल. काय भरोसा नाही, रस्त्यावर फिरायला भीती वाटते. पुण्यात लोकं लोक पूर्वी आनंदाने येत होते, आता पुण्यात जायला भीती वाटते. कुठून एखादी गॅंग येईल, कुठे कोणावर हल्ला होईल. आता पुण्यातील कोयत्याला राष्ट्रीय हत्यार म्हणून मान्यता दिली पाहिजे. जग कुठे चाललं आहे आणि पुण्यातील गॅंगवाले अजून कोयता घेऊन फिरत आहेत. अजित पवार यांना सांगा काहीतरी सुधारणा करा. नाही तर, आम्ही करू.”

ते पुढे म्हणाले की, “पुणे एकेकाळी आमच्या सगळ्यांचे आवडतं शहर, बाळासाहेबांचं आवडतं शहर. तरुण पिढीला माहित नसेल, बाळासाहेब यांचा जन्म पुण्यात झाला. पण आज पुणे हे गुंडांचं शहर म्हणून ओळखलं जातं. पुण्यातील अशी कोणतीही गॅंग नाही, ज्याच्या म्होरक्याला, ज्याच्या नातेवाईकाला या लोकांनी (महायुतीने) उमेदवारी दिली नाही. मी गंमतीने म्हणालो, दाऊद इब्राहिम यांना भेटला असता तर, दाऊदच्या भावाला आणि दाऊदच्या बायकोलाही यांनी तिकीट दिलं असतं. छोटा शकील, छोटा राजन यांनाही तिकीट दिलं असतं. गुंडांशिवाय हे निवडणुका जिंकू शकत नाही. पण अशा गुंडांशी सामना करण्याची शिवसेनेची परंपरा आहे. तुमच्या हातात सत्ता आहे, म्हणून तुमची ही गुंडगिरी आहे.”