Photo – हा आवाज कुणाचा शिवशक्तीचा…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आल्यानंतर दोन्ही नेत्यांची शिवतीर्थावर पार पडलेली ही पहिली अतिविराट सभा होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात अभूतपूर्व उत्साह संचारला होता. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक शिवतीर्थावर झालेल्या ‘शिवशक्ती’च्या सभेला मुंबईच्या उपनगरांतून लाखो शिवसैनिक-मनसैनिकांनी हजेरी लावली. 

(सर्व छायाचित्रे सचिन वैद्य, संदीप पागडे, रूपेश जाधव, राजेश वराडकर)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे एकत्र आल्याने विरोधकांना घाम फुटला आहे.

हे दाखविण्यासाठी शिवसैनिकांनी हातातभावकी जोमातगावकी कोमातअशा आशयाचे फलक झळकावले.

 

दिव्यांग बांधवांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू

‘शिवशक्ती’च्या अतिविराट सभेला दिव्यांग बांधवांनीही उपस्थिती लावली होती. मानखुर्द येथील 70 हून अधिक दिव्यांग बांधव आले होते. वाहतूक सेनेचे चिटणीस पैलास खुडे यांच्या सहकार्याने ते सर्वजण ढोलताशांच्या गजरात शिवतीर्थावर हजर राहिले हेते. वरळीतील अजय अंबादास गायकवाड हे एका पायाने दिव्यांग असलेले शिवसैनिक ‘ठाकरे बंधूं’ना एकत्र पाहण्यासाठी दाखल झाले होते. मी 20 वर्षांनंतर शिवतीर्थावर आलो. ‘ठाकरे बंधू’ एकत्र येण्याची मी वाट पाहत होतो, अशी प्रतिक्रिया अजय गायकवाड यांनी दिली. दोघांना एकत्र व्यासपीठावर पाहून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

धगधगतीमशालघेऊन जालन्यातील शिवसैनिक पोहोचले शिवतीर्थावर

शिवतीर्थावर अनेक ज्येष्ठ शिवसैनिक दाखल झाले होते. अनेकांच्या हातात धगधगती ‘मशाल’ होती. मुंबईच्या रक्षणासाठी पालिकेवर मराठी माणसाची, ‘शिवशक्ती’ची सत्ता आलीच पाहिजे. ती सत्ता मिळवून देणारच, असा निश्चय ज्येष्ठ शिवसैनिकांनी व्यक्त केला. जालना येथील अंकुश पवार हे निष्ठावंत शिवसैनिक घरापासून शिवतीर्थापर्यंत धगधगती ‘मशाल’ घेऊन आले होते.

मैदानाच्या तिन्ही प्रवेशद्वारांवर गर्दी

सायंकाळच्या सुमारास शिवसैनिक आणि मनसैनिकांची प्रचंड गर्दी लोटली. छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या तिन्ही प्रवेशद्वारांवर गर्दीचे चित्र पाहायला मिळाले. एवढय़ा प्रचंड गर्दीत सुरक्षात्मक तपासणी करताना पोलिसांची दमछाक झाली. गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी शिवतीर्थ आणि आसपासच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला होता. बॉम्बशोधक-नाशक पथकाच्या गाडय़ादेखील जागोजागी तैनात केल्या होत्या. शिवसैनिक आणि मनसैनिकांनी अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांना पुरेपूर सहकार्य केले.

 लहानग्या शिवसैनिकाची एण्ट्रीठरली लक्षवेधी

कांदिवली येथील स्वामी योगेश घरत या लहानग्या शिवसैनिकाची सभेतील ‘एण्ट्री’ लक्षवेधी ठरली. ठाकरे बंधू एकत्र आल्याचा आनंद व्यक्त करीत त्याने तमाम मराठी लोकांना पालिका निवडणुकीत विचार करून मतदान करण्याचा संदेश दिला. आजी-आजोबा, आई-बाबा, काका-काकी, मामा-मामी, आत्या, मावशी, ताई, दादा ‘ठाकरे बंधू’ काय सांगताहेत ते ऐका, नाहीतर उद्या आमच्या भविष्याला मुकाल, असा प्रभावी संदेश स्वामी घरतने फलकातून दिला. त्याचा हा संदेश उपस्थितांना प्रचंड भावला.

मुंबई जिंकायचीचअसा निर्धार करत शिवसेनामनसेराष्ट्रवादी युतीच्या सभेला हजर राहिलेले शिवसैनिक अभिमानानेमशालचिन्ह उंचावत होते. यावेळी तरुण शिवसैनिकांचा उत्साह जबरदस्त होता.

निष्ठा, शिस्त, सामाजिक बांधिलकीचे दर्शन

शिवतीर्थावर जथेच्या जथे जात होते. या प्रचंड गर्दीचा वाहतुकीत कोणताही अडसर येऊ नये म्हणून शिवसैनिक आणि मनसैनिक स्वयंस्फूर्तीने काळजी घेत होते. दादर परिसरातून रुग्णवाहिका जात होत्या. त्यांना गर्दीतून वाट मोकळी करून देण्याची सामाजिक बांधिलकी ‘शिवशक्ती’च्या सैनिकांनी जपली. रस्तोरस्ती, चौकाचौकात झालेल्या गर्दीमध्ये निस्सिम निष्ठा आणि शिस्तीचे दर्शन घडले.

शिवसेना भवनजवळ सेल्फी घेण्यासाठी गर्दी

तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘शिवसेना भवन’जवळ दुपारपासूनच शिवसैनिक आणि मनसैनिकांची गर्दी झाली होती. प्रत्येकाच्या हृदयात स्थान असलेल्या या वास्तूसोबत सेल्फी घेण्यासाठी सर्वजण पुढे सरसावत होते. ‘मराठी माणसाचं सुरक्षाकवच म्हणजे ठाकरे’, ‘भावकी जोमात, गावकी कोमात’ अशा आशयाचे फलक झळकावले जात होते. आम्ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक आहोत, अशी प्रतिक्रिया देत तमाम शिवसैनिक ‘शिवसेना भवन’वरील बाळासाहेबांच्या प्रतिमेपुढे नम्रपणे झुकत होता.