मार्लेश्‍वर-गिरिजा देवी यांचा विवाह थाटात संपन्न

लग्न सोहळा म्हणजे वर्‍हाडी, वाजंत्री, यजमानी, करवली, पौरोहित्य करणारे, मानकरी आदी लवाजमा आलाच माणसांच्या लग्नात एवढा डामडौल असतो मग देवाच्या लग्नात तर गोष्ट सोडाच… पृथ्वीतलावर सह्याद्रीच्या पर्वतराजीत वसलेल्या मारळ नगरीत आज दुपारी १२.३० च्या मुहुर्तावर आली लग्न घटी समीप नवरा घेऊनिया… वाजंत्री बहु गलबला न करणेचे सूर उमटले आणि उपस्थित लाखो भाविकांनी मंत्राक्षता टाकत साक्षात परमेश्‍वराचेच लग्न लावण्याचा योग साधला.

अखंड राज्यातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव मार्लेश्‍वरचा विवाह आज दुपारी सनई चौघड्यांच्या सुरात आणि मंगलाष्टका मंत्रोपचारांच्या मंगलमय वातावरणात कोंडगावची श्री देवी गिरिजा हिच्याबरोबर थाटात विवाह संपन्न झाला. देवांचे लग्न याची डोळा साठवण्यासाठी हजारो भाविकांनी सह्याद्रीच्या कपारीतही आज मकरसंक्रांतीचा अपूर्व योग साधला.

आंगवली येथील मूळ मठात विवाहापूर्वीचे सर्व विधी झाल्यावर काल रात्री विडे भरण्यासह महाप्रसाद, नवस बोलणे, नवस फेडणे असे विधी उरकून श्री देव मार्लेश्‍वरची मूर्ती; चांदीचा टोप प्रथेप्रमाणे सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आला. याचबरोबर गंगामाता आणि मल्लिकार्जुनाची मूर्तीही पालखीत स्थानापन्न झाली. त्यानंतर आंबवची दिंडी, वांझोळेची कावड, देवरुखची दिंडी, विवाहसोहळ्याचे यजमानी वाडेश्‍वर देवाची पालखी आदींचे मानकरी व भाविकांसह आंगवली मठात आगमन झाले. काल मध्यरात्री बरोबर 12 वाजता हर हर मार्लेश्‍वरचा जयघोष करीत हा सारा लवाजमा मार्लेश्‍वर शिखराकडे निघाला. ढोल, ताशे, गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत श्री देव मार्लेश्‍वरची पालखी मार्गस्थ झाली.

पालखी वाहण्याचा मान प्रथेप्रमाणे भोई समाजाचा होता तर सोबत मशालजी म्हणून चर्मकार बंधू, मारळचे सुतार, अबदागीर, कासारकोळवणचे ताशेवाले, चौरी, न्हावी बंधू याचप्रमाणे मानकरी आंगवलीचे अणेराव बंधू आदींसह हजारो भाविक यामध्ये सहभागी झाले होते. शिखराच्या पायथ्याजवळ असलेल्या पवईच्या पायरीवर हा सारा लवाजमा आणि साखरप्याहून आलेल्या वधू गिरिजादेवीची पालखी उत्तररात्रीनंतर एकत्र आल्यावर हर हर महादेवाच्या जयघोषाने सारा सह्याद्री दुमदुमून गेला. शिखरावर पोचल्यावर तीनही पालख्यांचे प्रथेप्रमाणे पारंपरिक स्वागत करण्यात आले.

तीनही पालख्या नियोजित ठिकाणी वस्तीला गेल्या. सोबत मानकरीही होतेच. पहाटे मुलीचे घर पाहणे, मागणी टाकणे, मुलाचे घर पाहणे, पसंती, ठरावनामा, कल्याणविधीची वेळ ठरवणे असे विधी झाले. दुपारी 1 वाजता विवाहासाठी 360 मानकर्‍यांना रीतसर निमंत्रण देण्यात आले. दुपारी 12 वाजून 30 मिनिटांच्या मुहुर्तावर श्री देव मार्लेश्‍वर आणि गिरिजादेवीचे लग्न लावण्यात आले. यासाठी आधीच हिंदू धर्मातील लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करण्यात आली होती. यावेळी करवलीचा मान प्रथेप्रमाणे गोठणे गावाकडे होता. मंगलाष्टका आणि मंत्रोच्चारांच्या मंगल वातावरणात रायपाटणकर स्वामी यांच्या पौरोहित्याखाली हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

आज यात्रोत्सवाचा मुख्य दिवस असल्याने होणारी गर्दी लक्षात घेऊन संपूर्ण मारळ परिसरासह मार्लेश्‍वर पायथा ते शिखर, धारेश्‍वर धबधबा आणि करंबेळीचा डोह आदी भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य परिवहन महामंडळाने पार्किंगपासून थेट पायथ्यापर्यंत जाणारी विशेष बससेवाही सुरू केली होती.