Ratnagiri News – महाराष्ट्राच्या हद्दीत घुसखोरी करत मासेमारी, साखरीनाटे बंदरात परप्रांतीय मच्छिमार नौका पकडली

महाराष्ट्राच्या समुद्र हद्दीत घुसखोरी करून मासेमारी करताना गोव्यातील हॉली क्रॉस आय व्ही नौका बुधवारी पकडण्यात आली. मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने साखरीनाटे बंदरात ही कारवाई केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली आहे.

ड्रोनच्या माध्यमातून गोव्यातील हॉली क्रॉस आय व्ही क्र.आयएनडी जीए 01 एमएम 2640 ही नौका महाराष्ट्राच्या हद्दीत पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या नवदुर्गा या गस्तीनौकेतून परवाना अधिकारी पार्थ तावडे आणि चिन्मय जोशी यांनी साखरीनाटे येथे मासेमारी करताना ही नौका रंगेहाथ पकडली. या कारवाईत सुरक्षारक्षक पर्यवेक्षक तुषार करंगुटकर, पुरूषोत्तम घवाळी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.