
>> बी. जी. गायकवाड, अध्यक्ष, भारतीय बहुजन आघाडी, महाराष्ट्र राज्य
बहुजन मातंग समाजाचे नेते बाबासाहेब गोपले यांनी 17 जानेवारी 1982 या दिवशी मोहनगाव (ता. कल्याण) येथे मातंग समाजाच्या पहिला भव्य मेळावा घेतला. अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा समाज बारा बलुतेदारांपैकी एक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरीही स्वातंत्र्याचा प्रकाश कधीही मातंग समाजाच्या दारावर फिरकलाच नव्हता. होणारा अन्याय व वागणूक निमूटपणाने सहन करीत हा समाज कित्येक वर्षांपासून जुलमी आयुष्य जगत होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांच्या समाजकार्यानंतरही हा समाज मागासच राहिला होता. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास व्हावा म्हणून मातंग समाजास आपल्या हक्काची जाणीव करून देऊन या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी 17 जानेवारी 1982 रोजी मोहनगाव (ता. कल्याण) येथे समाजाचा राज्यव्यापी पहिला मेळावा बाबासाहेब गोपले यांनी घेतला. त्यावेळी माझे आई-वडीलसुद्धा हजर होते. समाज जागृतीची मशाल पेटवली. आज त्याला 43 वर्षे झाली आहेत. आज 44 वा मातंग समाज क्रांतिचक्र परिवर्तन दिन आहे.
ज्येष्ठ नेते बाबासाहेब गोपले व पुसुमताई गोपले यांनी या समाजसेवेसाठी जीवन वेचले. 1982 ते 1985 या काळामध्ये महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडे मातंग समाजाच्या विकासासाठी 21 मागण्यांचे निवेदन दिले. मंत्रालयासमोर व दिल्लीत संसदेसमोर धरणे-मोर्चे काढत मातंग समाजाला अनेक गोष्टी मिळवून दिल्या. त्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, क्रांतिवीर लहुजी साळवे मातंम समाज अभ्यास आयोग, मुलुंड येथील मुलींच्या वसतिगृहातील मुलांना साळवे यांचे नाव, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार यांचा समावेश आहे. मुंबईमध्ये शासनाच्या जागेवर हजारो बेघरांना घरे दिली. अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी मातंग समाज तसेच दलित व बहुजन समाजाला अनेक प्रकारे न्याय मिळवून दिलेला नेता म्हणून बाबासाहेब गोपले यांचे नाव स्मरणात राहील.

































































