वेब न्यूज – Are You Dead?

>> स्पायडरमॅन

चीन म्हटला की, सर्वात आधी आठवते ते थक्क करणारे तंत्रज्ञान आणि भन्नाट अशी वेगवेगळी मोबाईल अॅप्स. आज चीनच्या अनेक अॅप्सवर सुरक्षेसाठी जगातील विविध देशांनी बंदी घातलेली असली, तरी अनेक चिनी अॅप्स आजही त्यांच्या खास कामगिरीने जगभरात मोठय़ा प्रमाणावर वापरली जात आहेत. मनोरंजन असो, खेळ असो, कोडी असोत, सगळ्या प्रकारची अॅप्स चीनचे तंत्रज्ञ बनवत असतात. मात्र सध्या चीनमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेल्या एका अॅपने तिथल्या अनेक समाजसुधारकांना चिंतेत टाकले आहे.

चीनमध्ये सध्या ‘ Are You Dead?’ नावाचे अॅप प्रचंड लोकप्रिय झालेले आहे. सर्वात जास्त वेळा डाऊनलोड होण्याचा विक्रमदेखील त्याने प्राप्त केला आहे. मात्र या अॅपमुळे चीनमध्ये वाढत चाललेले एकटेपण किती गंभीर समस्या बनले आहे हे प्रकर्षाने समोर आले आहे. Are You Dead? हे एक अत्यंत साधेसोपे अॅप असून ते डाऊनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या जवळच्या नातेवाईकांचे किंवा मित्रांचे नंबर अॅड करून ठेवायचे असतात. दर दोन दिवसांनी हे अॅप तुम्हाला एक मेसेज पाठवते आणि ‘‘Are You Dead?’’ असा प्रश्न करते. त्यानंतर निर्धारित वेळेत स्क्रीनवर दिसणारे हिरव्या रंगाचे मोठे बटण आपल्याला दाबावे लागले.

हे बटण वेळेत न दाबले गेल्यास सदर अॅप तुम्ही नोंदवून ठेवलेल्या नातेवाईक अथवा मित्रांशी लगेच संपर्क साधते आणि तुम्ही एखाद्या संकटात असून तुमच्याशी ताबडतोब संपर्क करण्याची विनंती करते. शहरापासून दूर राहणारे वृद्ध, इतर शहरांत शिक्षण घेणारे विद्यार्थी, नोकरदार यांच्यात हे अॅप प्रचंड लोकप्रिय झाले आहे. मात्र त्याच्यामुळे चीनमध्ये लोक किती मोठय़ा संख्येने एकटे पडले आहेत हेदेखील समोर आले आहे, असे तिथले मानसिक तज्ञ सांगत आहेत. एकटेपणाचा हा शाप दूर करण्यासाठी काय करता येईल यावर सध्या तिथे मोठी चर्चा चालू झालेली आहे.