महिला क्रिकेटमधील नियम फलंदाजांच्या बाजूने – सोफी डिव्हाइन

महिला क्रिकेट दिवसेंदिवस बदलत असून चाहत्यांना आकर्षित करण्यात यशस्वी होत आहे. महिला क्रिकेटची प्रसिद्धी वाढवण्यात महिला प्रीमिअर लीगचा (डब्ल्यूपीएल) मोठा हात आहे. त्यात हिंदुस्थानात सध्या सुरू असलेल्या डब्ल्यूपीएलमध्ये जगभरातील खेळाडू आपली कला दाखवत आहेत. अशातच न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार तथा अनुभवी अष्टपैलू खेळाडू सोफी डिव्हाइन हिने महिला क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणाचे नियम आणि सीमारेषेच्या अंतरावरून प्रश्न उपस्थित केले आहेत. आताच्या घडीला क्रिकेटमधील नियम फलंदाजांच्या बाजूने आहेत, त्याचा फटका गोलंदाजांना बसत असल्याचे तिने सांगितले.

सध्या महिला क्रिकेटमध्ये पॉवर प्ले नसलेल्या षटकांमध्ये केवळ चार क्षेत्ररक्षकांना आतील वर्तुळाबाहेर राहण्याची परवानगी आहे. अधिक धावांच्या उद्देशाने हा नियम लागू करण्यात आला होता. मात्र खेळ आता वेगळ्या वळणावर पोहोचल्याने या नियमात बदल करण्याची मागणी डिव्हाइनने केली. फलंदाजांची शॉट मारण्याच्या क्षमतेत वाढ पाहता, पाच क्षेत्ररक्षकांना वर्तुळाबाहेर परवानगी दिल्यास खेळाच्या स्पर्धात्मकतेवर नकारात्मक परिणाम होणार नसल्याचे तिने स्पष्ट केले. डिव्हाइन पुढे म्हणाली की, महिला प्रीमिअर लीगमध्ये कमाल सीमारेषेची लांबी 60 मीटर आहे, जी पुरुष क्रिकेटमध्ये 70 ते 77 मीटर एवढी आहे.