रोहितला वगळण्यामागे गंभीरचाही हात; माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीचा आरोप

हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये नेतृत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा पेंद्रस्थानी आला असून मोठा वाद निर्माण झाला आहे. आयसीसी स्पर्धांत विजेतेपद मिळवून देणाऱया कर्णधार रोहित शर्माला एकदिवसीय संघाच्या नेतृत्वातून बाजूला करण्याचा निर्णय अनेक क्रिकेट जाणकारांना धक्का देणारा ठरला आहे. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा विचार करत हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले, तरी या निर्णयाची वेळ आणि कारणे यावर तीव्र प्रश्न उपस्थित होत आहेत. भविष्यासाठी उचलेलेले हे पाऊल निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचे एकटय़ाचे नाही. यात प्रशिक्षक गौतम गंभीर यांचाही मोठा हात असल्याची शक्यता वर्तवत खळबळजनक आरोप केला आहे. मनोज तिवाराच्या थेट आरोपामुळे रोहितच्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

रोहित शर्मा हा हिंदुस्थानी क्रिकेटमधील अत्यंत यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. गेल्या काही वर्षांत त्याच्या नेतृत्वाखाली संघाने मोठय़ा स्पर्धांमध्ये यश मिळवले आणि संघाला स्थैर्य प्राप्त झाले. असे असतानाही एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेतृत्व बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय भविष्यासाठी असल्याचे सांगण्यात येत असले तरी अनेक माजी खेळाडू आणि चाहत्यांना तो अनावश्यकपणे कठोर वाटत आहे. इतका मोठा निर्णय निवड समितीच्या अध्यक्षांनी एकटय़ाने घेतला असे मानणे अवघड आहे. अशा निर्णयांमध्ये संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षकवर्गाचा सहभाग असतोच. पडद्यामागे अनेक चर्चा झाल्या असतील आणि या निर्णयात मुख्य प्रशिक्षकांची भूमिकाही असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सूचक विधान तिवारीने केले.

निवड समितीने 2027 च्या विश्वचषकाचा विचार करत युवा फलंदाज शुभमन गिलकडे एकदिवसीय संघाची जबाबदारी सोपवली आहे. दीर्घकाळ एकाच कर्णधाराखाली संघ खेळल्यास स्थैर्य मिळेल, असा यामागचा विचार आहे. मात्र रोहितच्या वयावरून उपस्थित केलेले प्रश्न त्याने फिटनेस, सातत्यपूर्ण कामगिरी आणि मानसिक ताकदीच्या जोरावर वारंवार चुकीचे ठरवले आहेत.

तसेच रोहित शर्मा 2027 च्या विश्वचषकात खेळू शकणार नाही, असा संशय व्यक्त केल्यावर तिवारीने आश्चर्य व्यक्त केले. तीन एकदिवसीय दुहेरी शतके करणाऱया आणि मोठय़ा स्पर्धांमध्ये संघासाठी निःस्वार्थ नेतृत्व देणाऱया खेळाडूच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणे हेच मूर्खपणाचे असल्याचे तो म्हणाला. 2023 च्या विश्वचषकातील रोहितची भूमिका ही त्याच्यात अजूनही भरपूर क्रिकेट शिल्लक असल्याचा ठोस पुरावा असल्याचे तिवारी म्हणाला.