

मुंबईसह 29 महापालिकांचे मतदान व निकाल लागले आहेत. मुंबई-ठाण्यात व इतरत्र हरामाचा पैसा निवडणुकीसाठी वापरला आणि सत्तेतल्या तिन्ही पक्षांकडे हा पैसा होता. त्यात गौतम अदानींच्या बादशाहीवर राज ठाकरे यांनी केलेल्या हल्ल्याने भूकंप झाला. त्याच भ्रष्ट पैशांवर भाजपने मुंबई अदानींच्या घशात घातली.
हा मजकूर लिहीत असताना मुंबईसह 29 महानगरपालिकांचे निकाल लागले आहेत. आतापर्यंत मुंबईत ‘ठाकऱ्यांची’ म्हणजे शिवसेनेची सत्ता होती. शिवसेनेने मुंबईला 23 महापौर दिले. हे सर्व महापौर कडवट मराठी होते. आता ही परंपरा पुढे राखली जाईल काय? असा प्रश्न पडावा, अशा प्रकारचे निकाल मुंबईत लागले. मराठी माणूस, मराठी अस्मितेचा पराभव एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार, अमित साटम या मराठी माणसांनी घडवून आणला. पुन्हा निवडणूक आयोगाची त्यांना संपूर्ण साथ मिळाली. त्यामुळे या निवडणुका की निवडणूक आयोगाने केलेल्या नेमणुका असा प्रश्न पडतो. महाराष्ट्रात भाजपची लहर आहे असे त्यांचे लोक सांगतात, पण ही लहर नसून सत्ता आणि भ्रष्ट पैशांचा कहर आहे. या भ्रष्ट पैशांच्या जोरावर मुंबई ताब्यात घेण्यासाठी भाजप व मिंधे गटाने काय करायचे बाकी ठेवले? या निवडणुकीतही आयोगाने प्रचंड गोंधळ घातला. मराठी भागात मतदारांची नावे वगळली गेली. बोटावरची शाई पुसली जाईल याची व्यवस्था करण्यात आली. गणेश नाईक यांच्या सारख्या मंत्र्यांचे नावही वगळले गेले. अशा हजारो घटना होऊनही शेवटी मतदारांनी कर्तव्य बजावले. हा मजकूर लिहीत असताना निवडणुकांचे निकाल पूर्ण लागलेले नव्हते. त्यामुळे निकालांचे विश्लेषण आज करता येत नाही. मुंबईसह 26-27 महापालिका जिंकू, असे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीआधी सांगितले. हा आत्मविश्वास आणि माज अफाट पैसा व सत्तेचा आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल एका चर्चासत्रासाठी मुंबईत आले व म्हणाले, “मुंबई पालिकेत आम्ही 200 जागा जिंकून दाखवतो.” हा आत्मविश्वास विकासकामांचा अजिबात नाही, तर यंत्र, पैशांचा मंत्र व दबाव तंत्राचाच आहे. या निवडणुका झाल्यावर महाराष्ट्रात काय उलथापालथी होणार याकडे पाहायला हवे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे बहुमत मोठे आहे. तरीही सरकारला स्थैर्य नाही. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात उभा दावा आहे. अमित शहा हे शिंदे यांचे एकमेव पालनहार आहेत. कारण मुख्यमंत्री फडणवीस व अमित शहांचे संबंध बरे नाहीत हे आता जगजाहीर आहे. त्यामुळे असंख्य भ्रष्टाचार व घोटाळे करूनही शिंदे यांना अभय मिळाले आहे. तरीही शिंदे आणि अजित पवारांना उघडे पाडायची एकही संधी श्री. फडणवीस सोडत नाहीत. शिंदे यांचा भ्रष्टाचार व पैसा गोळा करण्याची ‘हवस’ किती टोकाची आहे हे फडणवीस यांनी ‘लोकसत्ते’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ते सर्व प्रकरण स्फोटक आहे. मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी जी कामे काढली ती राज्याचे आर्थिक नियोजन बिघडवणारी होती. 20 रुपयांचे काम शिंदे यांनी त्यांच्या ठेकेदारांना 100 रुपयांना दिले. त्या 80 रुपयांतले 70 रुपये शिंदे यांच्या खिशात जात राहिले. प्रकल्पांचा खर्च वाढवून कमिशन खाण्याचे उद्योग श्री. फडणवीस यांनी रद्द केले. असे किमान 40 हजार कोटींचे प्रकल्प जे शिंदे यांनी मंजूर केले ते रद्द करण्याचे पुण्य कार्य श्री. फडणवीस यांनी केले. यामुळे शिंदे यांना चाप बसला. महापालिका निवडणुकीत शिंदे व त्यांच्या लोकांकडे ‘कॅश’ म्हणजे रोखीची चणचण भासली व फडणवीस यांना तेच हवे होते. हे खरे असले तरी मुंबईतील त्यांच्या उमेदवारांना प्रत्येकी 5 कोटी व इतर महानगरपालिकांत 2 कोटी देण्याची कामगिरी शिंदे यांच्या पक्षाने बजावली. मुख्यमंत्र्यांनी 40 हजार कोटींची कामे थांबवली ही शिंदे यांच्या आर्थिक उलाढालीतील लहान घटना आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही आता अमली पदार्थांच्या व्यवहाराचा पैसा पसरला आहे. याच पैशांनी ‘मतदार’ विकत घेतला जातो. हे सर्व भयंकर आहे. नशेच्या गोळ्या व नशेचा पैसा सत्ताधारी घरापर्यंत पोहोचवत आहेत. मग आता राहिले काय?
अदानींवर मोठा हल्ला
भाजपचे लाडके उद्योगपती गौतम अदानी यांनी महाराष्ट्रासह भारत देश कसा गिळला आहे याचे जोरदार प्रेझेंटेशन श्री. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेत दाखवले तेव्हा देश हादरला. आतापर्यंत राहुल गांधी दिल्लीत व उद्धव ठाकरे महाराष्ट्रात अदानींच्या राक्षसी वृत्तीवर प्रहार करत होते. राज ठाकरे यांनी अदानी यांनी व्यापलेला भारताचा व महाराष्ट्राचा नकाशा समोर आणला. भारताच्या संपूर्ण नकाशाचे मालक अदानी झाले. भारताचा मोठा भूभाग आधी चीनने गिळला व भारतांतर्गत गौतम अदानी यांनी मोक्याचा भूभाग व सार्वजनिक संपत्ती गिळली हे स्पष्ट दिसते. चीनने भारताच्या सीमा अरुणाचल प्रदेशपासून लडाखपर्यंत गिळल्या. त्यांची घुसखोरी सुरूच आहे, पण चीनच्या एका शिष्टमंडळासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्लीच्या कार्यालयात पायघड्या अंथरल्या. हे ढोंग आहे. अदानी यांचे साम्राज्य मागच्या दहा वर्षांत फक्त नरेंद्र मोदींमुळे उभे राहिले. अदानी यांनी जे उद्योग उभे केले ते प्रतिस्पर्ध्यांच्या कानावर बंदुकीची नळी लावून. सर्व एअरपोर्ट, बंदरे, सार्वजनिक उद्योग त्यांनी ताब्यात घेतले ते मोदी यांच्या आशीर्वादाने. हा सर्व पैसा आला कोठून? अदानी यांनी जवळपास 18 ते 20 टक्के कर्ज सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून घेतले. म्हणजे हा जनतेचा पैसा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला भोके पाडून हे कर्ज घेतले. हा अदानी समूह कधी डचमळला तर त्याचा परिणाम त्या बँकांमध्ये बचत असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकावर होईल. देशाची अर्थव्यवस्था कोसळून पडेल व अदानी परदेशात पलायन करतील. जनतेच्या पैशांवर मोदी आपले मित्र अदानींचे साम्राज्य वाढवत आहेत. हा इतिहासातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे युतीच्या विरोधात हाच भ्रष्टाचाराचा पैसा खेळतो आहे. धारावीपासून इतर अनेक जमिनी ताब्यात राहाव्यात म्हणून महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न अदानींचे लोक करत राहिले व त्या जाळ्यात काही जण फसले. गौतम अदानी यांनी मराठी एकजुटीचा पराभव होण्यासाठी पूर्ण ताकद मुंबईत लावली. भाजपला सत्ता मिळावी व मुंबई आपल्या ताब्यात यावी हे अदानींचे स्वप्न. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या मराठी माणसाने मुंबईत अदानींचा पाया भक्कम करण्यासाठी स्वाभिमान दिल्लीच्या दारात गहाण ठेवला हे इतिहासात नोंदले जाईल.
अजित पवारांचे धक्के
महापालिका निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपचे पुरते वस्त्रहरण केले. भाजपच्या भ्रष्टाचाराच्या व लुटमारीच्या फाईल्स आपल्याकडे आहेत हा बाम्ब टाकून त्यांनी खळबळ उडवली. भाजपने त्यांचे सरकार (1999) असताना 100 कोटींचा सिंचन घोटाळा केला व हे 100 कोटी ‘पार्टी फंड’ म्हणून वळवले. या व्यवहारात 10 कोटी लाच म्हणून अधिकाऱ्यांना दिले. पुरंदर जलसिंचन योजनेत हा घोटाळा झाला. योजनेची किंमत 330 कोटींपर्यंत वाढवली. ही वाढवलेली किंमत होती. 100 कोटी रुपये वाढवून फाईल तयार केली. 1999 मध्ये 100 कोटी म्हणजे आजचे दोनेक हजार कोटी. भाजपने सिंचन घोटाळा करून हे पैसे घेतले व अजित पवार यांनी भाजपचा सिंचन घोटाळा उघड केला. ही फाईल आपल्या ताब्यात असल्याचा स्फोट अजित पवार यांनी आता केला. गणेश नाईक यांच्या शब्दांत सांगायचे तर हा हरामाचा पैसा आहे. अजित पवार, भाजप आणि शिंदे यांच्याकडे मोठय़ा प्रमाणात हरामाचा पैसा आहे. हरामाच्या पैशांवर हे तिघे एकमेकांवर हल्ले करीत आहेत. तरीही तिघे एकाच सरकारमध्ये नांदत आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला व मुख्यमंत्र्यांनी प्रतिहल्ला केला. “भाजपने माझ्यावर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, पण आज मी त्यांच्या सरकारमध्ये आहे!” असे सांगून अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचा व मुख्यमंत्री फडणवीस यांचा मुखवटा फाडला. शिंदे यांचा 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार आपण कसा रोखला, हे मुख्यमंत्री फडणवीस खुलेपणाने सांगतात.
भ्रष्टाचाराच्या चिखलात बरबटलेला निवडणूक आयोग म्हणून ही निवडणूक लक्षात राहील. त्या चिखलात त्यांनी मुंबईलाही बुडवले. हरामाच्या पैशांचा खळखळाट असा घडला की, सगळ्यांचीच वस्त्रs वाहून गेली.
मराठी माणूस, मुंबईच्या रक्षणासाठी ‘ठाकरे बंधूं’नी झुंज दिली. हा अस्मितेच्या लढय़ाचा इतिहास नव्याने लिहिला जाईल.
महापालिका निवडणुका संपल्या, निकाल लागले. खरे राजकारण पुढेच घडणार आहे!
Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]































































