मुंबईची राणी! युपीविरुद्ध एकटी भिडली, WPL च्या इतिहासात अशी कामगिरी करणारी पहिलीच खेळाडू

गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा खेळ WPL 2026 मध्ये आतापर्यंत सर्वसाधारण राहिला आहे. मुंबईने पाच सामने खेळले असून त्यांना फक्त दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. काल (16 जानेवारी 2026) झालेल्या युपी वॉरियर्झविरुद्धच्या सामन्यातही मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, या सामन्यात मुंबईची अष्टपैलू खेळाडू अमेलिया केरने एकहाती सामना फिरवण्याचा कौतुकास्पद प्रयत्न केला. ती सामना जिंकवू शकली नाही पण तिच्या खेळीमुळे WPL च्या इतिहासात तिच्या नावाची नोंद झाली आहे.

प्रथम फलंदाजी करताना युपी वॉरियर्स संघाने मुंबईला जिंकण्यासाठी 188 धावांचे आव्हान दिले होते. अमेलिये केरने केलेल्या अचूक माऱ्यामुळे युपीच्या वेगवान फलंदाजीला ब्रेक लावण्यास मुंबईला यश आले. अमेलियाने 4 षटकांमध्ये फक्त 28 धावा दिल्या आणि तीन विकेट घेतल्या. तसेच फलंदाजीमध्येही तिने एकटीने खिंड लढवली. युपीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची घसरगुंडी झाली होती.

मुंबईच्या फलंदाजांनी या सामन्यात सर्वांनाच नाराज केलं. 69 धावांवर अर्ध संघ माघारी परतला होता. परिस्थिती बिकट होती परंतू अमेलिया केरने अमनजौत कौरच्या सोबतीने खिंड लढवली आणि विजयश्री खेचून आणण्यासाठी दमदार फलंदाजी केली. अमनजौतने 24 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 41 धावांची खेळी केली. तर अमेलियाने 28 चेंडूंमध्ये 1 षटकार आणि 6 चौकार मारत 49 धावांची नाबाद खेळी केली. अवघ्या एका धावाने तिचे अर्धशतक हुकले. या सामन्यात तिने आपल्या 50 विकेटचा ऐतिहासिक टप्पा पार केला आणि विक्रमाला गवसणी घातली. WPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू म्हणून अमेलिया केरने सिंहासन काबीज केलं आहे.