लोकशाही, न्यायव्यवस्था आणि संविधान वाचवा! सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत ममता बॅनर्जींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या उपस्थित केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला. तपास यंत्रणांकडून जाणीवपूर्वत लोकांची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी लोकशाही, न्यायव्यवस्था आणि संविधान वाचवण्याचे आवाहन केले. त्या जळपाईगुडी येथे कोलकाता उच्च न्यायालयाच्या नवीन सर्किट बेंचच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी सरन्यायाधीश सूर्य कांत आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही उपस्थित होते.

माझी सरन्यायाधीश आणि सर्व न्यायाधीशांना विनंती आहे की, आपले संविधान, लोकशाही, सुरक्षा, इतिहास आणि भूगोल यांचे संकटापासून संरक्षण करावे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच न्यायालयाने निकाल देण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी मीडिया ट्रायल करू नये. आजकाल लोकांची बदनामी करण्याचा हा एक ट्रेंड झाला आहे. तपास यंत्रणांकडून जाणीवपूर्वक लोकांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

कृपया जनतेचे रक्षण करा. मी हे स्वतःसाठी म्हणत नाहीये. लोकशाही, न्यायव्यवस्था, देश आणि संविधान वाचवा. आम्ही तुमच्या संरक्षणाखाली आहोत. न्यायव्यवस्थेपेक्षा मोठे कोणीही नाही, असेही यावेळी ममता बॅनर्जी न्यायाधीशांना उद्देशून म्हणाल्या.

भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिकांवर हल्ले होत आहेत, ममता बॅनर्जी यांचा आरोप

विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात ईडीने तृणमूल काँग्रेसची राजकीय रणनीती बनवणाऱ्या ‘I-PAC’ च्या कार्यालयावर धाड टाकली होती. आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आणि पक्षाची महत्त्वाची कागदपत्र चोरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. अशात त्यांनी सरन्यायाधीशांसमोर केलेले विधान त्याच्याशी संबंधित असल्याचीच चर्चा रंगत आहे.

बंगालमध्ये बाबरी मशीद उभारण्याचा कट राजकीय, सरसंघचालक मोहन भागवत यांचा दावा