
बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंच्या हत्येचे सत्र सुरूच आहे. ढाकापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसिंगदी शहरामध्ये एका 23 वर्षीय हिंदू तरुणाला गाढ झोपेत असताना जिवंत जाळण्यात आले. चंचल चंद्र भौमिक असे निर्घृण हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून आहे. गॅरेजमध्ये झोपलेला असतानाच अज्ञातांनी त्याला जिवंत जाळले. यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
माध्यमात आलेल्या वृत्तानुसार, चंचल चंद्र भौमिक हा कुमिल्ला जिल्ह्यातील लक्ष्मणपूर गावचा रहिवासी होता. नरसिंगदी पोलीस लाईन्सला लागून असलेल्या खानबारी मशीद मार्केट परिसरात असणाऱ्या एका गॅरेजमध्ये तो काम करत होता आणि तिथेच राहत होता. शुक्रवारी रात्री काम संपवून थकलेला चंचल गॅरेजमध्येच झोपी गेला होता. तो झोपेत असतानाच अज्ञात व्यक्तींनी गॅरेजला आग लावली.
गॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल, इंजिन ऑईल आणि इतर ज्वलनशील पदार्थ असल्याने आग वेगाने पसरली. गाढ झोपेत असलेल्या चंचलचा गुदमरून आणि होरपळून मृत्यू झाला. या घटनेशी संबंधित एक व्हिडीओही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून एक व्यक्ती दुकानाच्या बाहेर आग लावते आणि आग वेगाने पसरते हे यात स्पष्ट दिसत आहे. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त करत ही घटना एक नियोजित हत्या असल्याचे म्हटले आहे.
सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद
जवळपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हल्लेखोर गॅरेजला आग लावताना दिसत आहेत, मात्र त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत.
बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या; गाडीखाली चिरडले, परिसरात तणावाचे वातावरण
गेल्या आठवड्यातील काही प्रमुख घटना –
- गाझीपूरा – आपल्या कर्मचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिंदू मिठाई दुकानदाराची बेदम मारहाण करून हत्या.
- सिलहट – एका हिंदूचे घर पेटवून दिले.
- फेनी – एका हिंदू रिक्षाचालकाची भोसकून हत्या.

























































