जम्मू-कश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरूच; श्रीनगर विमानतळावरील 50 विमान सेवा रद्द, राष्ट्रीय महामार्ग 44 बंद

जम्मू-कश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. बर्फवृष्टीमुळे येथील रस्ते बंद आहेत. कश्मीरमधील बर्फवृष्टीचा श्रीनगर येथील विमानसेवेवरही परिणाम आहे. श्रीनगर विमानतळावरील सुमारे 50 विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. खराब हवामान आणि सततची बर्फवृष्टी यामुळे श्रीनगर विमानतळावर येणाऱ्या 25 आणि जाणाऱ्या 25 विमान सेवा रद्द केल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.

विमानांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे कश्मीरमध्ये शेकडो पर्यटक अडकले आहेत. नवयुग बोगदा आणि आसपासच्या परिसरात झालेल्या बर्फवृष्टीमुळे मंगळवारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग (एनएच-44) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग 44 व्यतिरिक्त, मुघल रोड, एसएसजी रोड आणि सिंथन रोड देखील खराब हवामान आणि निसरड्या रस्त्यामुळे वाहतुकीसाठी बंद आहेत. पुढील सूचना येईपर्यंत जम्मूहून श्रीनगर किंवा श्रीनगरहून जम्मूकडे कोणत्याही वाहनांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले.

पाऊस आणि बर्फवृष्टीचा अलर्ट जारी

जम्मू-कश्मीरमध्ये मंगळवारी पुन्हा पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळपासून मंगळवारपर्यंत राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता श्रीनगर येथील हवामान केंद्राने वर्तवली आहे. तसेच वादळ आणि विजांसह ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागात भूस्खलन आणि दगड कोसळण्याचा धोकाही हवामान विभागाने वर्तवला आहे.