
अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झालं आहे. या पदावर आता कोणाची वर्णी लागले, अशी चर्चा सुरू असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. सुनेत्रा पवार या उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे, असं वृत्त ‘टीव्ही९ मराठी’ने दिलं आहे.
‘टीव्ही९ मराठी’ने दिलेल्या वृत्तानुसार, अजित पवार गटाच्या सर्व आमदारांची शनिवारी दुपारी दोन वाजता महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवड पार पडणार आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड जवळपास निश्चित असून त्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा शनिवारी सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे, असं बोललं जात आहे. या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
दरम्यान, याचबद्दल बोलताना अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ म्हणाले होते की, “अजित पवार गटाच्या विधिमंडळ सदस्यांची उद्या म्हणजेच शनिवारी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेता ठरवला जाणार आहे. पक्षाकडून सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी होऊ शकते.”
ते म्हणाले की, “उद्याची बैठक पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची असून यात विधिमंडळ पक्षनेता ठरवला जाईल. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेत्यावर एकमत झालं तर, उद्याच शपथविधी देखील होऊ शकतो.”



























































