रामलीलेत रामाचा नेम चुकला; बाणामुळे रावणाचा डोळा फुटला, सोनभद्रमधील अजब प्रकरण चर्चेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यातील एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. शाहगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरा गावामध्ये आयोजित रामलीलेत रामाचा नेम चुकला आणि बाण थेट रावणाच्या डोळ्यात घुसला. धक्कादायक म्हणजे राम बनलेल्या कलाकाराने किंवा आयोजकांनीही रावण बनलेल्या जखमी व्यक्तीला मतदही केली नाही आणि रुग्णालयातही पोहोचवले नाही. एवढेच नाही तर त्याला शिवीगाळ करत मारहाणही केली.

मिळालेल्या माहितीनुसार, 13 नोव्हेंबर 2025 रोजी खैरा गावात रामसनेही सिंह यांनी रामलीलेचे आयोजन केले होते. यामध्ये सुनील कुमार हा तरुण ‘रावण’ची भूमिका साकारत होता, तर नैतिक पांडे हा ‘राम’ बनला होता. राम-रावण युद्धाचा प्रसंग सुरू असताना, नैतिक पांडेने सोडलेला एक बाण थेट सुनीलच्या डोळ्यात घुसला.

बाण लागताच सुनीलच्या डोळ्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि तो वेदनेने विव्हळू लागला. मात्र, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मंचावर उपस्थित असलेल्या आयोजकांनी किंवा ‘राम’ बनलेल्या नैतिकने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याची तसदीही घेतली नाही.

वेळेवर उपचार न मिळाल्याने सुनीलचा तो डोळा कायमचा निकामी झाला. गरीब परिस्थिती असल्यामुळे त्याने आयोजक आणि नैतिक पांडे यांच्याकडे उपचारासाठी आर्थिक मदतीची याचना केली. मात्र, मदतीचा हात देण्याऐवजी आरोपींनी त्याला जातीवाचक शिवीगाळ केली आणि चक्क जीवे मारण्याची धमकी देऊन हाकलून लावले. एवढेच नाही तर, उपचारासाठी दबाव टाकल्यामुळे त्याला मारहाणही करण्यात आली.

दरम्यान, शारीरिक वेदना आणि आर्थिक विवंचनेमुळे खचलेल्या सुनीलने अखेर कायदेशीर आधार घ्यायचे ठरवले. या प्रकरणी पोलिसांनी ‘राम’ बनलेला नैतिक पांडे आणि आयोजक रामसनेही सिंह यांच्याविरुद्ध SC-ST ॲक्ट आणि मारहाणीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रार प्राप्त होताच गुन्हा नोंदवण्यात आला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे घोरावल क्षेत्राधिकारी राहुल पांडे यांनी सांगितले.